वाढत्या वयात महिलांमध्ये 'या' आजारांचा धोका जास्त, हे उपाय करून स्वतःला ठेवा फिट.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:13 AM2020-03-11T10:13:07+5:302020-03-11T10:14:24+5:30
वाढत्या वयात पुरूषांपेक्षा महिलांना आजारांचा सामना करावा लागत आहे. या उपायांचा वापर करून तुम्ही वाढत्या वयात सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता.
३० वयानंतर जेव्हा वय हळूहळू वाढू लागतं. तेव्हा महिलांनी आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे आजारी असण्याचे प्रमाण आणि शारीरिक समस्या उद्भवण्याचे प्रमाण जास्त असते. महिलांना प्रेग्नंसी, मेनोपॉज अशा स्थितीतून जावं लागतं. याशिवाय हाडं कमजोर होण्यासह रोगप्रतिकारकशक्ती कमी होणं, सांधेदुखी, सेक्शुअली पसणारे आजार आणि त्यातून होणारं शरीराचं नुकसान होत जातं.
त्यासाठी महिलांनी चांगला आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांना जर वाढत्या वयात आजारांपासून वाचायचं असेल तर काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय करून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल.
चांगला आहार घ्या
आपल्या आहारात जैविक पदार्थांचा समावेश करा. म्हणजेच आहारात ताजी फळं, भाज्या, अंडी यांचा समावेश करा. अलिकडच्या काळात महिलांना घरातील काम आणि ऑफिसचे काम यातून वेळ मिळत नसल्यामुळे त्याचं खाण्यापिण्याकडे आहाराकडे लक्ष नसतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा घरात उरलेलं शिळं अन्न खाल्यामुळे प्रकृती बिघडते. आहारात तेल, साखर आणि मीठाचा कमी प्रमाणात ठेवाल तर अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते.
ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्याचे उपाय
ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचायचं असेल तर तुम्ही सतत तपासणी करत असणं गरजेचं आहे. भारतात 22 टक्के महिलांचा मृत्यू हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे होतो. तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असाल तर यापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात दह्याचा समावेश करणं आवश्यक आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक असतं. रोज एक वाटी दही खाल्याने पाचन क्रिया सुरळीत होते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन आणि अन्य मिनरल्स आढळून येतात.
व्यायाम करा
जर तुम्हाला वाढत्या वयात आजारांपासून लांब राहायचं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. महिलांना अनेकदा व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. घरातील आणि बाहेरच्या कामातून अनेकदा दगदग होत असते. पण त्यासाठी जीमला जाण्याची किंवा कुठल्या क्लासला जाण्याची काही गरज नाही. घरच्याघरी १५ ते २० मिनिट वेळ काढून व्यायाम करून तुम्ही आजारांना लांब ठेवू शकता. ( हे पण वाचा- Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....)
फ्री रॅडीकल्सपासून स्वतःला लांब ठेवा
आरोग्यासाठी हानीकारक असलेले युवी रेज स्किन कॅन्सरचं कराण सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे कमी वयातच तुम्ही जास्त म्हातारे असल्यासारखे दिसू लागता. त्यासाठी सुर्याच्या किरणापासून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लावा. शरीरातील उघड्या भागाला सुद्धा कव्हर करा. ( हे पण वाचा- टूथब्रश ते हेअर ब्रेश, आजारी पडायचं नसेल तर या रोजच्या वापरायच्या वस्तू कधी बदलायच्या?)