२०१९ या वर्षातलं वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण दिसू लागलं आहे. देशाच्या बहुतांश भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्यानं विलोभनीय दृश्य दिसू लागलं आहे. गुजरातमधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. पडद्यावर चंद्र-सूर्यामधील लपंडावाचा महासोहळा सुरू झाला असून त्याचं ‘मध्यांतर’ म्हणजे चंद्रानं सूर्याला जास्तीतजास्त झाकण्याची अवस्था सकाळी ९.२२ ला, तर शेवट (मोक्ष) सकाळी १०.५५ ला होणार आहे. हा खेळ सावल्यांचा दोन तास ५१ मिनिटे रंगणार आहे.
तामिळनाडू, केरळ, ओदिशा या भागात कंकणाकृती ग्रहण दिसू लागलं आहे. तर उर्वरित भारतात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. सांगली, कोल्हापूरमधून हे ग्रहण ८४ टक्क्यांपर्यंत दिसेल. केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील काही भागांमधून ते पूर्णत: दिसत असून उर्वरित भारताच्या ग्रहणपट्ट्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागांतून मात्र ते ‘खंडग्रास’ दिसणार आहे. जाणून घ्या हे वर्षातलं शेवटचं ग्रहण पाहताना कोणती घ्यायची काळजी.
ग्रहण पाहत असताना ते उघड्या डोळ्यांनी पाहू नका.
होममेड फिल्टर्स म्हणजेच घरातील साध्या चष्म्याचा वापर सुध्दा ग्रहण पाहण्यासाठी करू नका.
ग्रहण पाहण्यासाठी स्पेशल सोलार फिल्टरर्सचा वापर करा.
एक्लिप्स ग्लास किंवा सोलार युजर्स असतात त्यांचा वापर करा.
फिल्टरवर नमुद करण्यात आलेल्या गोष्टी आधी वाचा.
लहान मुलांना ग्रहण दाखवत असाल तर विशेष काळजी घ्या.
कॅमेरा किंवा टेलिस्कोप किंवा दुर्बिणीचा वापर करून ग्रहण पाहू नका.
सोलार फिल्टर वापरण्याच्या आधी तपासून पाहा जर त्यावर स्क्रॅच असेल तर त्यांचा वापर करू नका .
एक्सरेचा वापर करून सुर्य ग्रहण पाहू नका.
टेलिस्कोपचा वापर करत असाल तर सोलार फिल्टर आणि स्काय एंड च्या बाजूला असलेले टेलिस्कोप आयपील जवळ नेऊ नका.
जर तुम्हाला शक्य असेल तर उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहण्यापेक्षा तुम्ही टिव्हीमध्ये बघूनसुध्दा ग्रहणाचे निरीक्षण करू शकता. कारण या बाबतीत जर तुम्ही कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारली तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे.