ठाणे: कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आज जागतिक किडनी दिवस साजरा होत असून आजही किडनीच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. किडनीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार ‘जागतिक किडनी दिन’ म्हणून पाळला जातो. बहुतेक वेळा किडनीच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोड्या कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. जागतिक किडनी दिनानिमित्त मुंबईत किडनी - एक महत्वाचा अवयव" या विषयावर डॉक्टरांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये डॉक्टर , नर्सेस तसेच डायलेसीस उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सहभाग घेतला होता. याविषयी अधिक माहिती देताना
किडनीविकारतज्ञ डॉ अमित जैन याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, " आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयव म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या (मूत्रपिंडे) आहेत. सरासरी वयाच्या तिशीपर्यत अनेकांना आपल्या किडनीच्या कार्याविषयी माहिती नसते. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.
किडनी फेल्युअरच्या प्रमुख कारणांमध्ये ३५ टक्के वाटा हा मधुमेहाचा व १७ टक्के वाटा हा उच्च रक्तदाबाचा असून बैठी जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. आज भारत मधुमेहाची राजधानी बनली असून गेल्या ३ ते ४ वर्षात किडनीच्या विकारांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मूत्रपिंड हा आपल्या मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून साऱ्या शरीरातली दूषित द्रव्ये बाहेर काढायचे महत्त्वाचे काम निसर्गाने त्याच्याकडे सोपवलेले आहे.अनेक कारणांनी जेव्हा कायमस्वरूपी किडन्या निकामी होतात त्यावेळी मात्र आपल्याला या दुर्लक्षित अवयवाचे महत्व कळू लागते परंतु गेल्या काही महिन्यामध्ये भारतातील अनेक शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी सुट्टी अथवा ब्रेकची नियमावली करण्यात आली असल्यामुळे लहानपणापासूनच किडनीचे आरोग्य संतुलित राहण्यास मदत होणार आहे. अशी नियमावली कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तसेच असंघटीत कामगार क्षेत्रात करणे महत्वाचे आहे.
किडनीवरील ताण कमी करण्यासाठी व शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तुम्ही जितके अधिक पाणी पिता तितकी अधिक लघवी तुमच्या शरीरात निर्माण होते. सहाजिकच त्या लघवीसोबत शरीरातील विषद्रव्ये देखील बाहेर टाकली जातात. त्यामुळे तुमच्या किडनीवरचा भार कमी होतो व किडनी समस्या होण्याचा धोका देखील कमी होतो."
बांधकाम तसेच छोट्या कारखान्यामध्ये व इतर असंघटीत क्षेत्रात काम करीत असलेले कामगार तसेच शेतामध्ये राबत असलेल्या विशेषतः महिलांसाठी ( ऊसतोडणी कामगार ) यांच्यासाठी "बेल फॉर वॉटर" व"बेल फॉर युरीन"सारखे उपक्रम राबवून त्याना स्वच्छ शौचालये उपल्बध करून देणे महत्वाचे आहे, कारण या क्षेत्रातील अनेकांवर कामाच्या व्यापामुळे व शौचालय उपल्बध नसल्यामुळे लघवी तुंबविण्याची वेळ येते व या कारणांमुळे मूत्रपिंडाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते. मूत्रपिंडाचा जंतूसंसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि गरोदर स्त्रियांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे किडनीविकारतज्ञ डॉ अमित जैन यांनी दिली.