डॉक्टरांकडून अनेकांनी हिमोग्लोबिन हा शब्द ऐकला असेल. हिमोग्लोबिन कमी झालं वगैरे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हिमोग्लोबिन काय आहे? किंवा त्याचा आरोग्याशी काय संबंध? तर आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिनबाबत काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही हीमोग्लोबिन योग्य ठेवून आरोग्य चांगलं ठेवू शकता.
हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हे आवश्यक असतं. याचा नेमका अर्थ हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे काय तर रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणं.
हिमोग्लोबिन कमी झालं तर काय होतं?
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची शक्यता वाढते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती असायलाच हवी.
किती असावं हिमोग्लोबिनचं प्रमाण?
सहा महिन्यातून एकदा डेली रुटीन चेकअप करून हिमोग्लोबिनचं प्रमाण जाणून घेता येतं. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की, हिमोग्लोबिनचे प्रमाण वय आणि लिंगानुसार वेगवेगळं असतं. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकतं, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवं. प्रौढ वयातील महिलांमध्ये याचे हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे.
हिमोग्लोबिन योग्य ठेवण्यासाठी काय खावे?
पालक
पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.
बीट
बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीट खाण्यामुळे मिळू शकतात.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. तसेच यातून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. त्यामुळे तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायच असेल तर आहारात टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.
डाळिंब
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराला शक्ती मिळते.
सुकामेवा
मूठभर सुकामेवा दररोज खावा असे नेहमीच मोठ्यांकडून आपण ऐकतो. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळू शकते.
मध
मध शरीरासाठी अतिशय चांगले असते. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात. कारण मधामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. मधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.
सफरचंद
सफरचंद हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्ससाठी नेहमीच सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच यात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते.
आणखीही काही उपाय
लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात सोयाबीन, टोफू, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर यांचाही समावेश करा.