सततचा ताण, वाईट जीवनशैली आणि जंक फुडच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. अनेकजण यामुळे आहाराच्या बाबतीत अत्यंत सजग झाले आहेत. मग अशावेळील दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे का? असा प्रश्न पडणं साहाजिक आहे. साधारण असा समज आहे की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणार नाही. तज्ज्ञांच्या मते याची अजिबात गरज नाही. सर्वसाधारणपणे, जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ वापरत असाल तर त्याचा तुमच्या कोलेस्ट्रॉलवर वाईट परिणाम होणार नाही. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही तेच सत्य आहे. जर तुम्ही ही उत्पादने जास्त प्रमाणात वापरत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. आणि तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया, दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकते (Dairy Products in High Cholesterol) का?
दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढू शकते का?यासाठी आधी कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? हे समजून घेऊ. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. Healthline.com च्या मते, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे LDL आणि हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे HDL. एचडीएल कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल मानले जाते. तर एलडीएल हे खराब कोलेस्ट्रॉल मानले जाते. जेव्हा रक्तात LDL चे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते.
दुग्धजन्य पदार्थ खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात का? दुग्धजन्य पदार्थ आपले शरीर मजबूत करतात. मात्र असे असले तर दुग्धजन्य पदार्थांमधील खराब कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. ज्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबी जास्त असते ते तुमच्यासाठी हानिकारक असतात. ते तुमची LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल पातळी वाढवतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला नियमितपणे दुग्धजन्य पदार्थ वापरायचे असतील तर कमी चरबीयुक्त पदार्थांचा वापर करावा. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि त्यांचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही किंवा वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही.