अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. यामुळे फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात. यालाच आपण धाप लागणं असं म्हणतो. याकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. वारंवार होणारा हा त्रास दूर करण्यासाठी काही उपाय आहेत. शरीराला भासणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराला बाहेरून अतिरिक्त ऑक्सिजन देणं फायदेशीर ठरतं.
महत्त्वाचं कारण
धाप लागण्याची साधरणतः दोन मुख्य कारणं सांगण्यात येतात. एक म्हणजे लठ्ठपणा आणि दुसरं म्हणजे शरीरात असलेली रक्ताची कमतरता. शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं मुख्य काम हे हिमोग्लोबिन करतं. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचीच कमतरता असेल तर मात्र शरीराला ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही. आपल्या देशामध्ये अनेक महिला कुपोषणाच्या शिकार आहेत. तसेच अनेक महिलांमध्ये गरोदरपणातील समस्या आणि त्यामध्ये होणारा अधिकाधिक रक्तस्त्राव यांमुळे रक्ताची कमतरता आढळून येते. देशात दोन मुलांच्या जन्मामधील अंतर कमी असणं हे देखील एनीमिया आणि धाप लागणं यांसारख्या आजारांच मुख्य कारण आहे.
1. लठ्ठपणा ठरतोय शाप
सध्या लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. नियमितपणे सकाळी चालणं आणि व्यायामाची कमतरता, व्यसनं करणं, अधिक फॅट्स असलेल्या पदार्थांचं भरपूर सेवन करणं यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाची शिकार होत आहेत. थोडीशी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते अशी समस्या अनेक लठ्ठ लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. वेळीच योग्य उपाय केल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते.
फुफ्फुसांमध्ये झालेलं इन्फेक्शन, निमोनिया आणि टीबी यांसारखे आजार धाप लागण्याची सर्वात प्रमुख कारणांपैकी एक आहेत. श्वसननलिकेला सूज येणं हे देखील धाप लागण्याचं कारण ठरू शकतं. याला वैद्यकिय भाषेमध्ये अस्थमॅटिक ब्राकाइटिस असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या अपघातामध्ये छातीला झालेल्या दुखापतीची नीट काळजी घेऊन योग्य ते उपचार घेतले नाही तर त्यामुळे फुफ्फुसांवर दबाव येतो. त्यामुळे धाप लागते.
एखादी व्यक्ती हृदय विकारांनी त्रस्त असेल तरीदेखील धाप लागण्याची समस्या उद्भवते. जर हृदय कमजोर असेल आणि मागच्यावेळी आलेल्या हार्ट अटॅकमुळे हृदयाचा एखादा भाग कमजोर झाला असेल तर त्यामुळे हृदय कमजोर होतं. जर एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच हृदयाशी निगडीत आजार आहेत तर शरीरामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होतं. अशावेळी शरीरावर निळसरपणा दिसून येतो. ओठ आणि हातांच्या बोटांवर याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे धाप लागते.
आवश्यक तपासण्या
धाप लागण्याचा त्रास वारंवार होत असेल तर काही महत्त्वाच्या तपासण्या करून घेणं फायदेशीर ठरतं. छातीचा एक्स-रे काढणं, एचआर, सीटी स्कॅन, पीएफटी, हृदयासाठी डीएसई, रक्त तपासणी यांसारख्या तपासण्या करणं फायदेशीर ठरतं.
धाप लागल्यावर काय कराल?
वारंवार धाप लागत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्याने आवश्यक त्या तपासण्या पूर्ण करा. त्यानंतर देण्यात आलेले सर्व औषधोपचार पूर्ण करा.