ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरु आहे. तसेच पोलीसांकडून देखील मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करुन ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. परंतु आता महापालिका मुख्यालयात सुध्दा जायचे झाल्यास मास्क घालूनच जावे लागणार आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क नसेल त्यांच्याकडून आता ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध स्वरुपाचे उपाय सुरु आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय समजला जात आहे. परंतु आजही नागरीक मास्कचा वापर टाळतांना दिसतात. किंवा मास्क असुनही ते नाकाच्या खाली घालतात. अशा प्रकार महापालिका मुख्यालयात मास्क न वापरता फिरणाºयांना महापौर म्हस्के यांनी चांगलाच सज्जड दम भरला होता. शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना अशा पध्दतीने मास्क असून न वापरणे हे अयोग्य असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. परंतु आता येथे येणाºया प्रत्येक नागरीकाला मास्कचे महत्व समजावे या उद्देशाने महापौरांनी आता जे मास्कचा वापर या ठिकाणी करणार नाहीत, त्यांच्यावर ५०० रुपये दंडाची कारवाई करावी असे आदेश संबधींत प्रशासनाला दिले आहेत.त्यानुसार गुरुवारी सकाळ पासून महापालिका मुख्यालयाच्या चारही गेटवर मास्क असेल त्यांनाच मुख्यालयात प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क दिसणार नाही. त्यांच्यावर ५०० रुपये दंडाची पावती आकारली जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणेला देखील खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुख्यालयाच्या आवारात देखील मास्क असून नागरीकांकडून ते वापरले जात नसतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये नगरसेवक असतील, पालिकेचे कर्मचारी असतील किंवा अन्य कोणीही असेल त्यांनी देखील या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका मुख्यालयात नो मास्क नो एन्ट्री, दंडाची कारवाई सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:44 AM