वजन वाढण्याची आणि हाय बीपीची 'ही' असू शकतात कारणे, जाणून घ्या उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:52 AM2019-08-22T10:52:59+5:302019-08-22T10:53:16+5:30
अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजची तरूणाई गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकत आहे.
कामाचा ताण, लहान मुलांचा अभ्यास, धावपळ, करिअरची चिंता, बिझी लाइफस्टाईल, अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजची तरूणाई गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकत आहे. यात सर्वात जास्त भेडसावल्या जाणाऱ्या समस्या म्हणजे लठ्ठपणा आणि हृदयासंबंधी आजार. या समस्या होण्याची कारणे आणि त्यावरील उपचार काय आहेत जे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
लठ्ठपणा
ही आज सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या झाली आहे. लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, लोक या समस्येला केवळ सामान्य लठ्ठपणा समजून याकडे दुर्लक्ष करतात आणि याची गंभीरता ते समजून घेत नाहीत. मुळात ब्लडप्रेशर, डायबिटीस आणि हृदयरोग या गंभीर समस्यांचं कारणच लठ्ठपणा आहे.
काय आहे कारण?
आरामदायक लाइफस्टाईल, फिजिकल एक्टिविटी आणि एक्सरसाइजची कमतरता, जंक फूड, तेलाचे पदार्थ अधिक खाणे, साखर अधिक खाणे, सॉफ्ट ड्रिंक आणि अल्कोहोलचं अधिक सेवन करणे तसेच अनियमित दिनचर्या ही लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत. एकंदर काय तर लोक ज्याप्रमाणात कॅलरी घेतात, त्या तुलनेत ते बर्न करू शकत नाहीत. यामुळेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि लोकांचं वजन वाढू लागतं.
कसा कराल बचाव?
मैदा, तेल, जंक फूड, गोड पदार्थ, चॉकलेट, केक-पेस्ट्री, सॉफ्ट ड्रिंक आणि अल्कोहोलपासून दूर रहावे. तसेच रोज खाण्यात साखरेचं प्रमाण कमी ठेवावं. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा. तसेच पायी चालावे. सकाळी आणि सायंकाळी वॉक व एक्सरसाइजसाठी वेळ काढावा. शारीरिक हालचाल सतत होत राहिली तर वजन कमी करण्यास मदत होईल.
कोलेस्ट्रॉल वाढणं
कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ असतो. सामान्यपणे कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचा असतो. एचडीएल(हाय डेसिंटी लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल) म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल(लो डेंसिटी लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉलमध्ये प्रोटीन भरपूर असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तर बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये प्रोटीनऐवजी फॅटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे फॅट रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं. यानेच हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
काय आहे कारण?
आहारातून ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले जसे की, तूप, तेल, लोणी, अल्कोहोल आणि रेड मीटचं अधिक सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं.
कसा कराल बचाव?
आहारात डाळी, कडधान्य, बीन्स, दलिया यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच बदाम, अक्रोडही खावेत.
हाय ब्लडप्रेशर
जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्या टणक होतात, तेव्हा रक्ताची पंपिंग करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. याने हृदयावर रक्ताचा दबाव वाढतो. यालाच हाय ब्लडप्रेशर म्हटलं जातं.
काय आहे कारण?
तणाव, चिंता असणे, एक्सरसाइज आणि शारीरिक हालचाल कमी करणे तसेच जंकफूडचं अधिक सेवन करणे.
कसा कराल बचाव?
हाय ब्लडप्रेशरची समस्या दूर करायची असेल तर जंक-स्ट्रीट फूड खाऊ नये. तसेच मिठाचं कमी सेवन करावं. जास्त चिडचिड करू नये आणि नियमितपणे एक्सरसाइज करावी. त्यासोबतच नियमितपणे बीपी चेक करा.