वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडीला सुरुवात, हिवाळ्यातील आरोग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:59 AM2017-11-23T02:59:12+5:302017-11-23T02:59:24+5:30
वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे.
- रीना चव्हाण
वातावरणातील तप्तता कमी होऊन गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. घामाच्या धारांनी बेजार झालेल्यांसाठी थंडीची ही चाहूल नक्कीच सुखद आहे. आरोग्याचा विचार करता ऋतू कोणताही असला तरी शरीराला पाण्याची नेहमीच गरज असते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा आणि पावसाळ्यात बाहेरील वातावरण थंड असल्याने तहान कमी लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो; पण त्यामुळे आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यासाठी दररोज गरजेएवढे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळेच हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाण्याऐवजी तुम्ही आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असणाºया पदार्थांचे सेवन करू शकता. जेणेकरून शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्याबरोबर शारीरिक स्वास्थ टिकून राहील.
दही
सर्दी, खोकला, ताप आदी आजार या हंगामात डोके वर काढतात. त्यामुळे हिवाळा आहे दही खाऊ नका. उन्हाळ्यात दही खाणे चांगले, असे बरेच जण सांगतात; पण हिवाळ्यात सकाळच्या नाष्ट्यात दही किंवा लस्सी घेतल्याने तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते, कारण त्यात ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. तसेच यातील कॅल्शिअममुळे हाडेसुद्धा मजबूत होतात.
पालक
पालकमध्ये प्रोटीन, विटॅमीन, आयर्नबरोबर पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात याचा नक्की समावेश असावा. पालक भाजी किंवा सूप घेतल्याने शरीरातील पाण्याची कमरता दूर होईल.
तांदूळ
तांदूळ वा भात आहारातील मुख्य घटक आहे. कारण त्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही, मग कोणताही ऋतू असो. शिजवलेल्या तांदळात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कार्बोहायड्रेट सारखे महत्त्वपूर्ण घटक असतात.
ब्रोकोली
पोषक घटनांबरोबरच ब्रोकोलीमध्ये ८९ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ब्रोकोली नुसती उकडून खाल्ली, तरी आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर असते.
फळ
सफरचंदामुळे ८९ टक्के पाणी असून फायबर, विटॅमीन सी, कॅल्शिअम बरोबर अन्य पोषक घटकांचा यात समावेश असतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. संत्र आणि मोसंबी यांच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्या, तरी पोषक तत्त्वांबरोबर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अननस, दाक्षे, ब्ल्यू बेरी, स्टॉबेरी, कलिंगड यांच्या सेवनानेही हिवाळ्यातील पाण्याची कमतरता पूर्ण होईल.
लिंबू
लिंबामध्ये विटॅमीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळेच आहारात सलाड, फळांबरोबर लिंबाचा समावेश गरजेचा.
सलाड
गाजर, काकडी, मुळा, टोमॅटो यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात आहारात यांचा नेहमी समावेश असावा.