(Image Credit : Daily Express)
अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, पचन न होणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण जेवण ही सर्वात महत्त्वाची क्रिया असून ती योग्यप्रकारेच केली गेली पाहिजे.
तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला.
अभ्यासकांनुसार, एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं आणि दिवसातून तीन ते चार वेळा काही खायला हवं. या अभ्यासात ३० ते ६९ वयोगटातील ११२२ पुरुष आणि २१६५ महिलांच्या जेवणाच्या सवयी व त्यांच्या शरीरावर एक अभ्यास करण्यात आला. यातील अर्ध्या पुरुषांना आणि अर्ध्या महिलांना पटापट पोटभर जेवण करण्यास सांगितले. नंतर असे आढळले की, यांचं वजन इतरांच्या तुलनेत वेगाने वाढलं होतं. चला जाणून घेऊ चावून चावून खाण्याचे फायदे...
वजन कमी करणे - जेवण बारीक चावून खाल्ल्याने पोटात रसायनांची निर्मिती होते, ज्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचन होतं. याने लवकर भूकही लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याआधी ही एक चांगली सवय लावली तर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या होणार नाही.
सकारात्मक प्रभाव - जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं.
पचनक्रिया चांगली राहते - जेवण चांगलं बारीक चावून खाताना तोंडात लाळ तयार होते, याने पदार्थ मुलायम होतात. तसेच बारीक चावून खाल्ल्याने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स वेगळं करते. याने पचनक्रिया चांगली होते.
कॅविटीपासूनच बचाव - जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही.
बॅक्टेरिया नष्ट होतात - जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.
कसे कराल जेवण?
पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करुन खावे. पदार्थ तोपर्यंत चावत रहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाहीत. पदार्थ लगेच गिळायचे नाहीत. पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया चांगली होत नाही. त्यामुळे पदार्थ आधी चावून बारीक करावे मग गिळावे. पदार्थ खाताना पाणी पिऊ नये.