आपल्या तोंडातील लाळ (Saliva) ही फार महत्त्वाची असते. आता याच लाळेच्या नमुन्यांमधून (Saliva Sample) आपल्या शरीराला कोणते रोग जडले आहेत, याचा शोध घेतला जाऊ शकतो. लाळेवर चाचणी करून डायबेटिस (Diabetes) ते कॅन्सरपर्यंतच्या (Cancer) सर्व आजारांचा शोध घेता येईल, असे संशोधकांनी म्हटलं आहे. यामुळे कमी वेळेत निदान करता येईल. मानवी लाळेमध्ये ७०० सूक्ष्म जीव, यूरिक अॅसिडसारखी संयुगं आणि अनेक रसायनं आढळतात. ज्यातून कोणता आजार जडला आहे, याचा शोध घेतला जाऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. तर लाळ चाचणी किती सोपी असेल आणि यातून आजारांचा (Saliva test could detect many disease) शोध कसा घेतला जाईल, हे जाणून घेऊया.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, लाळेतील युरिक अॅसिड आणि रोग यांच्यातील संबंधाचा संशोधकांनी शोध लावला आहे. जर शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल तर ती इतर अनेक गोष्टींकडे इशारा करते. याचा अर्थ, रक्तदाब वाढू शकतो. तसेच युरिक अॅसिड वाढल्यानंतर हृदयविकार, किडनीचे आजार, कर्करोग, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणं, डायबेटिस आणि कर्करोगाचा देखील शोध घेतला जाऊ शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रोफेसर दत्ता मेघ यांनी सांगितले.
काय असतं युरिक अॅसिड?तर सोप्या शब्दांत युरिक अॅसिड हे रक्तामध्ये आढळणारं रसायन असतं. प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचन प्रक्रियेदरम्यान याची निर्मिती होते. मटार, पालक, मशरूम, सोयाबीन, डुकराचं मांस, चिकन, मासे, मटण, राजमा आणि बिअरमध्ये प्युरीन आढळतात. याचे सेवन केल्यानंतर शरीरात युरिक अॅसिड तयार होते आणि रक्तात मिसळते. तर उर्वरित किडनीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकले जाते. मात्र, शरीरात प्युरीनचे प्रमाण ठराविक प्रमाणापेक्षा अधिक झाल्यानंतर किडनीद्वारे फिल्टर होत नाही. परिणामी शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते आणि समस्या निर्माण होतात.
बायोप्सी किंवा रक्त चाचणी करण्याऐवजी यूरिक अॅसिड टेस्ट केल्यास अनेक रोगांचा शोध घेतला जाऊ शकतो. तसेच वेळेआधीच येणारे झटकेही टाळता येतात, असे ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट प्रोफेसर राज प्रसाद यांनी सांगितले.
यापूर्वीदेखील अनेक संशोधन अहवालांतून युरिक अॅसिडचे धोके सांगण्यात आले होते. हायपरटेन्शन जर्नलमध्ये वर्ष 2018 ला एक संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या महिलांना रक्तदाबाचा धोका दुप्पट असतो. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३७ टक्के होते, असे या अहवालात म्हटलं होतं. तर वर्ष २०२० मध्ये जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये एक संशोधन अहवाल प्रकाशित झाला होता. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर कर्करोगाचा धोका देखील वाढतो. तसंच त्याचं प्रमाण जर अधिक असेल तर नैराश्य, चिंता, अल्झायमरचा धोका वाढतो. असं या अहवालात म्हटलं होतं.