पोटात विसरलेली कात्री ५ वर्षांनी बाहेर काढली; केरळमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:44 AM2022-10-10T05:44:00+5:302022-10-10T05:44:13+5:30
हर्शिनाच्या पोटात २०१७ पासून हे फाेरसेप होते. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर पोटातच विसरून गेले होते.
कोची : शस्त्रक्रिया ही तशी गंभीरतेने घेण्याचीच गोष्ट आहे. शस्त्रक्रियेचे नाव काढले तरी पोटात गोळा उठतो. नातेवाईकांना टेंशन येते. असे असले तरी अनेकवेळा अगदी हलगर्जीपणामुळे गंभाीर प्रकार घडतात, तेही डॉक्टरांच्या विसरभोळेपणातून आणि मग त्या रुग्णाचा जीव मात्र टांगणीला लागतो. केरळमधील कोझिकोडमध्ये डॉक्टरांनी ३० वर्षीय हर्शिना या महिलेच्या पोटातून फोरसेप काढला. हे कात्रीसारखे शस्त्रक्रियेचे हत्यार असून त्याद्वारे रक्तवाहिन्या पकडतात.
प्राप्त माहितीनुसार, हर्शिनाच्या पोटात २०१७ पासून हे फाेरसेप होते. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर पोटातच विसरून गेले होते. ती बाहेर काढून कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्यांना वेदनेतून मुक्त केले खरे; परंतु, आता महिलेने डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. (वृत्तसंस्था)
तरुणाच्या पोटातून काढला स्टीलचा ग्लास
पाटणा : पाटणा वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षांच्या तरुणाच्या पोटात अडकलेला स्टीलचा ग्लास बाहेर काढण्याची किमया डॉक्टरांनी साध्य केली आहे. ११ डॉक्टरांनी तब्बल अडीच तास केलेल्या शस्त्रक्रियेनंतर या तरुणाला नवजीवन मिळाले. असे असले तरी एवढा मोठा ग्लास तरुणाच्या पोटात गेलाच कसा, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. रितेशकुमारची मानसिक स्थिती ठीक राहत नाही. त्यातूनच हा पेला पोटात गेला असावा, असा डॉक्टरांचा कयास आहे.