नवी दिल्ली : चिकुनगुनिया विषाणूची लागण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर १० ते १५ दिवस नव्हे, तर तीन महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका असतो, असे नव्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस’ या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो डासांनी चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. या आजाराला सामान्यतः पिवळा ताप असेही म्हणतात.
संशोधक म्हणतात...बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, पण तरीही चिकुनगुनिया हा आजार घातक ठरू शकतो. या संसर्गाची बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, परंतु २०२३ मध्ये जगभरात अंदाजे पाच लाख जणांना चिकुनगुनिया झाला, तर ४०० पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला.ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) चे प्राध्यापक आणि अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक ॲनी दा पायक्साओ क्रूझ म्हणाले की, १० कोटी ब्राझीलमधील नागरिकांच्या डेटाचा वापर करून संशोधकांनी चिकुनगुनियाच्या सुमारे दीड लाख प्रकरणांचे विश्लेषण केले.
निष्कर्ष काय? लोकांना तीव्र संसर्गाचा कालावधी संपल्यानंतरही गुंतागुंत होण्याचा धोका तीव्र संसर्गाचा कालावधी लक्षणे दिसल्यानंतर १४ दिवसांचा असतो.पहिल्या आठवड्यात संक्रमित व्यक्तीचा मृत्यूचा धोका दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत आठ पटीने जास्त असतो. संक्रमित व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत गुंतागुंत होण्याचा धोका दुप्पट असतो.
चिकुनगुनिया का वाढतोय? हवामानातील बदल, शहरीकरण आणि वेगाने वाढणाऱ्या मानवी कारणांमुळे एडिसजन्य आजार वाढून इतर भागात पसरण्याचा धोका आहे.
उपचार काय? विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली होती.