दात पिवळे असल्याने चारचौघात हसताही येत नाही? हा सोपा उपाय करून दात करा चमकदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:16 PM2024-05-25T12:16:54+5:302024-05-25T12:40:01+5:30
Teeth Whitening Home Remedy: या उपायाने दात पांढरे आणि चमकदार तर होतीलच सोबतच दातांच्या हिरड्याही मजबूत होतील. चला जाणून घेऊ कसा कराल हा उपाय आणि काय होतात याचे फायदे...
Teeth Whitening Home Remedy: दातांचा पिवळेपणा ही बऱ्याच लोकांची समस्या असते. दातांवर पिवळेपणा असला की, चारचौघात नीट मोकळेपणाने हसताही येत नाही. तुम्ही नेहमीच ब्रश करत असाल तरीही दातांवर पिवळेपणा असतो. दातांवरील हा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. पण सगळ्यांनाच याचे फायदे होतात असं नाही.
तुम्हालाही ही समस्या असेल आणि अनेक उपाय करून सुद्धा ही समस्या दूर झाली नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा खास उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय म्हणजे ज्येष्ठमधाचं पावडर आणि दह्याचं मिश्रण. या उपायाने दात पांढरे आणि चमकदार तर होतीलच सोबतच दातांच्या हिरड्याही मजबूत होतील. चला जाणून घेऊ कसा कराल हा उपाय आणि काय होतात याचे फायदे...
ज्येष्ठमध आणि दह्याचे फायदे
ज्येष्ठमध पावडर आणि दह्याचा वापर दात चमकदार आणि पांढरे करण्यासाठी एक जुना आणि नैसर्गिक उपाय आहे. या उपायाने दातांचा पिवळेपणा लगेच दूर होतो आणि दात पांढरे होतात.
ज्येष्ठमधाचे फायदे
ज्येष्ठमधात अनेक असे तत्व असतात जे दात आणि हिरड्यांसाठी चांगले असतात. यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात. जे दातांना किड लागू देत नाही. तसेच हिरड्यांवरील सूजही कमी करतात.
दह्याचे फायदे
दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात जे दात मजबूत करतात आणि दातांना चमकदार करतात. दह्यामधील लॅक्टीक अॅसिड दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात.
कसं तयार कराल मिश्रण
एक चमचा ज्येष्ठमध पावडर आणि त्यात २ चमचे दही टाका. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशच्या माध्यमातून दातांवर लावा. हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे ब्रश करा. त्यानंतर तोंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
या गोष्टींची घ्या काळजी
हा उपाय करताना या गोष्टीची काळजी घ्या की, ही पेस्ट दातांवर जास्त घासू नका. तसं केलं तर दाताच्या वरच्या थराचं नुकसान होऊ शकतं.
जर तुम्हाला या दोन्हीपैकी एकाही गोष्टीची एलर्जी असेल तर या पेस्टचा वापर किंवा हा उपाय करू नका.
दात चमकदार आणि पांढरे करण्यासाठी ज्येष्ठमध पावडर आणि दह्याचं मिश्रण एक प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. या उपायाने दातही चांगले होतात आणि तोंडाचं एकूण आरोग्यही चांगलं राहतं.