अन्नपदार्थ ठेवण्यासाठी फॉइल पेपर चांगला की बटर पेपर?; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:11 PM2024-06-20T15:11:25+5:302024-06-20T15:24:41+5:30
अन्न पॅक करण्यासाठी आपण अनेकदा ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करतो. पण याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का?
प्रवासात किंवा ऑफिसमध्ये अन्न पॅक करण्यासाठी आपण अनेकदा ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करतो. पण याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का? आपण अनेकदा म्हणतो की, यामध्ये अन्न ठेवल्याने अन्न गरम आणि चांगलं राहतं, परंतु अन्नासाठी वापरण्यात येणारा पॅकिंग पेपर आरोग्यासाठी खरंच चांगला आहे का? हे जाणून घेऊया...
ॲल्युमिनियम फॉइल आरोग्यासाठी हानिकारक
ॲल्युमिनियम फॉइल पेपर अन्न पॅक करण्यासाठी सर्रास वापरतात, परंतु अलीकडेच याबद्दल एक रिसर्च समोर आला आहे ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स ॲल्युमिनियम फॉइल'नुसार, ॲल्युमिनियम फॉइल पेपर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे अन्नकणांचं ऑक्सिडायझेशन करतं. ज्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.
मेंदू आणि हाडांचं खूप नुकसान
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स ॲल्युमिनियम फॉइल' नुसार जेव्हा आपण गरम आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असलेलं अन्न ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतो तेव्हा लीचिंगची भीती वाढते. व्हिटॅमिन सी असलेलं अन्न ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केल्यामुळे ऑक्सिडाइज होतं. त्यामुळे शरीरातील ॲल्युमिनियमचं प्रमाण वाढू लागतं. तसेच मेंदू आणि हाडांचं खूप नुकसान होतं.
बटर पेपरचा वापर अधिक चांगला
बटर पेपरला रॅपिंग पेपर किंवा सँडविच पेपर म्हटलं जातं. हा ॲल्युमिनियम फॉइलपेक्षा चांगला आहे. बटर पेपर हा नॉन-स्टिक पेपरसारखा असतो, तो सेल्युलोजने बनलेला कागद असतो. हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानात याचा वापर केला जातो. जो ओलावा प्रतिबंधित करतो. हा अन्नातील अतिरिक्त तेल देखील शोषून घेतो. त्यामुळे तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. जर तुम्हाला खारट, मसालेदार आणि व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ पॅक करायचे असतील तर त्यासाठी बटर पेपर हा उत्तम पर्याय आहे. हा ॲल्युमिनियम पेपरपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो.