घोरण्यावर उपाय काय? जाणून घ्या श्वसनविकार तज्ज्ञांकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 11:24 AM2022-10-09T11:24:43+5:302022-10-09T11:24:56+5:30
झोपेत घोरणाऱ्या काही व्यक्तींना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया हा आजार होऊ शकतो. यामध्ये त्या व्यक्तीला झोपताना नाकातील हवेचा प्रवाह कमी होत असतो.
- डॉ. प्रशांत छाजेड, श्वसनविकार तज्ज्ञ
पेत घोरणे हे ऐकायला खूपच सामान्य वाटत असले,तरी ‘घोरणे’ याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. श्वसन प्रक्रियेत अडथळा आणणारे हे लक्षण असून,यावर वेळीच उपचार केले नाहीत,तर भविष्यात जडणाऱ्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक बळावते. अनेक जणांना झोपेत घोरायची सवय असते. काहीजण याच्यावर खिल्ली उडवून मोकळे होतात,तर अनेकजण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात. मात्र,घोरण्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय विश्वात शास्त्रीयरीत्या अभ्यास करून नेमके निदान काय,हे शोधून काढले जाते. त्यानंतर,काही व्यक्तींना श्वसन मार्ग सुकर व्हावा,यासाठी झोपण्याच्या वेळी रोज श्वसनाशी निगडित एका उपकरणाचा आधार घेऊन झोपावे लागते,हे कटू सत्य आहे.
झोपेत घोरणाऱ्या काही व्यक्तींना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया हा आजार होऊ शकतो. यामध्ये त्या व्यक्तीला झोपताना नाकातील हवेचा प्रवाह कमी होत असतो. यामागील विशेष कारण म्हणजे तोंड आणि नाकाच्या वरच्या भागात हवा भरते. परिणामी,श्वासनलिका लहान होते. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या कारणाने त्रास होणाऱ्या रुग्णाचा श्वास झोपेत असताना अचानक थांबतो,हे त्यांनाही कळत नाही. यामध्ये श्वसन घेण्यास त्रास होतो, म्हणून काही लोक दचकून उठतात, तसेच दिवसभर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी, लक्ष विचलित होणे, अशा गोष्टी घडत असतात. लठ्ठपणा, लहान मान असणाऱ्या रुग्णांमध्ये सर्रास घोरण्याचा प्रकार आढळून येतो.
घोरण्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे,श्वसन मार्गात अडथळे आल्याने हृदयाच्या कार्यावर याचा परिणाम होऊन हृदयविकार होण्याची शक्यता असते; तसेच रक्तदाब,मधुमेह यांसारख्या व्याधींना सामोरे जावे लागते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असते.
घोरण्याचा वारंवार त्रास होत असेल,तर झोपेचा अभ्यास करून गरज पडल्यास काही व्यक्तींना सी-प्याप् किंवा बाय-प्याप् गरजेनुसार या दोन वैद्यकीय उपकरणांचा वापर करण्यास सुचवितो,जी झोपेच्या वेळी लागतात. मात्र,काही निवडक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. हा आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी व्यायाम करावा,वजन नियंत्रणात ठेवावे.