कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात वाढत आहे. अशा स्थितीत जगभरातील लोकांना कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी येणार याची प्रतिक्षा आहे. कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस तयार केल्याचा दावा आतापर्यंत चीन आणि रशियाने केला आहे. भारत, अमेरिकेसह अनेक देश कोरोनाची लस तयार करण्याचे काम वेगाने करत आहेत. दरम्यान दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
भारतीय बाजारात कोरोनाची लस कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते हे सांगताना त्यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका टेलिव्हिजन कार्यक्रमात बोलताना एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आता प्रगतीपथावर आहे. सर्व चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास २०२१ च्या सुरूवातीला कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. सुरूवातीला लस उपलब्ध झाल्यास सर्व लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात असेलच असं नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी वेळ लागू शकतो.
पुढे त्यांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरसचं औषध कधी येणार याची शाश्वती देणं कठीण आहे. कारण कोरोनाची लस किंवा औषध तयार करायचं असल्यास अनेक टप्प्यामधून जावं लागतं. सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वकाही व्यस्थित असेल तर कोरोनाची लस किंवा औषध लवकरता लवकर उपलब्ध होऊ शकते. लस विकसित झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने लस बाजारात उतरवायची याचीही समस्या उभी राहू शकते. अनेक संस्थानांनी औषधांचे प्राथमिक वितरणाच्या आधारावर म्हणजेच ज्यांना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त आहे. अशा लोकांना लस देण्याचा विचार केला आहे. रशियातील मॉस्कोमध्ये सामान्य लोकांसाठी लसीकरण सुरू केलं आहे. ''
देशात कोरोनाचा हाहाकार
दरम्यान जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे.
रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.