हो, लठ्ठपणा आजार आहे, त्यावर उपचार केले पाहिजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:27 PM2024-03-04T13:27:36+5:302024-03-04T13:28:44+5:30

लठ्ठपणावर बोलल्याशिवाय समाजात या आजाराविषयी जनजागृती होणार नाही. अनेक जण लठ्ठपणा हा आजार आहे, हे मान्यच करत नाहीत. मात्र, लठ्ठपणाशी निगडित इतर आजार झाल्यावर लोकांना जाग येते आणि मग धावपळ सुरू होते.

Yes, obesity is a disease, it should be treated | हो, लठ्ठपणा आजार आहे, त्यावर उपचार केले पाहिजेत

हो, लठ्ठपणा आजार आहे, त्यावर उपचार केले पाहिजेत

डॉ. संजय बोरुडे, स्थूलत्व तज्ज्ञ 

आज जागतिक स्थूलता दिन. आरोग्य संस्थेने लठ्ठपणा हा आजार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे हा आजार असेल तर त्यावर नक्कीच उपचार केले पाहिजेत. वैद्यकशास्त्रात लठ्ठपणा हा सर्व आजारांचा राजा आहे, हे असे म्हटले आहे. कारण अपेक्षेपेक्षा अधिक वजन असेल आणि शरीरात अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) असेल तर त्या व्यक्तीला हृदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण, लिव्हरचे (यकृत) विकार, निद्रा विकार, वंध्यत्व या आजारांसह काही विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

लठ्ठपणावर बोलल्याशिवाय समाजात या आजाराविषयी जनजागृती होणार नाही. अनेक जण लठ्ठपणा हा आजार आहे, हे मान्यच करत नाहीत. मात्र, लठ्ठपणाशी निगडित इतर आजार झाल्यावर लोकांना जाग येते आणि मग धावपळ सुरू होते. मात्र, लठ्ठपणा का आला, याची उत्तरे शोधली जात नाहीत. माझ्या मते लठ्ठपणा काय आहे, हे अगोदर समजून त्या आजाराचे मूळ कारण शोधले पाहिजे. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 

लठ्ठपणा हा आनुवंशिक असू शकतो. दुसरे म्हणजे बाह्य कारणामुळे लठ्ठपणा वाढीस लागत असतो. यामध्ये तळलेले, जास्त कॅलरी असलेले खाद्यपदार्थ खाणे, तसेच अनेकवेळा बैठ्या स्वरूपाचे काम करणे. शारीरिक हालचाल फार कमी प्रमाणात करणे. जंक फूड नियमित खाल्ल्यामुळे चरबी प्रमाणापेक्षा अधिक वाढते. शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय नाही. तो सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. आज अनेक औषधोपचार, सोबत विविध थेरपी, जिम आणि डाएटद्वारे वजन कमी करता येते.      

काही दिवसांपूर्वीच जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात विश्लेषण करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जगात १०० कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लठ्ठपणाचा आजार आहे. त्यामध्ये १९९० ते २०२२ पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण कसे वाढत गेले, यावर भाष्य केले आहे. यामध्ये भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे १.२५ कोटी मुले ही स्थूल आहेत. त्यात ७३ लाख मुलगे आणि ५२ लाख मुली आहेत. ही २०२२ची आकडेवारी आहे. भारतामध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलत्त्वाचे प्रमाण १९९० मध्ये १.२ टक्के होते ते २०२२ मध्ये महिलांमध्ये ९.८ टक्के, तर पुरुषांमध्ये ५.४ टक्के इतके वाढले आहे. देशात ४.४ कोटी महिला, २.६ कोटी पुरुषांना हा आजार झाला आहे. महिलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 

आपल्याकडे आरामाची व्याख्या बदलून गेली आहे. पूर्वी आराम म्हणजे मैदानी खेळ खेळणे, फिरणे, ट्रेकिंग करणे हा प्रकार होता. आता मात्र अनेक जण आराम म्हणजे कॉम्प्युटर, टीव्ही, इंटरनेटचा अतिवापर, टीव्हीसमोर बसूनच खाणं पसंत करतात. या सगळ्या गोष्टींमुळे लठ्ठपणा वाढीस लागतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जितके तुम्ही लवकर उपाय सुरू करता, त्याचा अधिक फायदा होतो. केवळ शहरी भागात लठ्ठपणा असलेल्या व्यक्ती आढळतात असे नाही तर आता ग्रामीण भागातसुद्धा लठ्ठ व्यक्ती आढळून आल्या आहेत. 

बॅाडी मास इंडेक्स म्हणजे काय? 
लठ्ठपणा शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजण्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. शरीराची उंची आणि वजनाचे गुणोत्तर याला बॅाडी मास इंडेक्स (बीएमआय) असे म्हणतात. बीएमआयमुळे शरीराचे वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की नाही, याची आपल्याला माहिती मिळते. विशेष म्हणजे आपल्याला दिशा मिळते. सर्वसाधारणपणे १८.५ ते २४.५ च्या दरम्यान बीएमआय असावा. त्यापेक्षा २५पेक्षा अधिक असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर बीएमआय ३०पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणाची सुरुवात आहे. त्यांनी त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.

Web Title: Yes, obesity is a disease, it should be treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.