Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘Virafin’ फायदेशीर औषध; जाणून घ्या किती आहे प्रतिडोस किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:44 PM2021-05-11T19:44:24+5:302021-05-11T19:45:30+5:30
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने २३ एप्रिलरोजी आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली – संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या महामारीनं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. कोरोना रोखण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. अद्याप कोरोनावर ठोस औषध उपलब्ध झालं नाही परंतु कोविड १९ च्या उपचारासाठी Zydus Cadila च्या Virafin या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
या औषधाची किंमत ११ हजार ९९५ रुपये इतकी प्रति डोस आहे. कंपनीने या औषधाचा पुरवठा करणंही सुरू केलं आहे. Virafin कोविड १९ च्या रुग्णांसाठी एक सिंगल डोस आहे. त्याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने २३ एप्रिलरोजी आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी परवानगी दिली आहे. Zydus Cadila चा दावा आहे की, हे औषध कोविड १९ रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज कमी करते. Virafin ला तांत्रिक भाषेत Pegylates Interferon alpha 2 b नावानं ओळखलं जातं. या औषधाचं कोविड १९ च्या रुग्णांवर क्लिनिकल चाचणीत चांगले परिणाम दिसून आले आहेत.
कंपनीने म्हटलं आहे की, हे औषध रुग्णांच्या प्राथमिक अवस्थेत दिल्यानंतर वायरल लोड कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला कोरोनाशी लढण्यासाठी अँन्टिबॉडी तयार होत आहेत. Virafin घेतलेल्या ९१.१५ टक्के रुग्णांचे RT PCR रिपोर्ट ७ दिवसांच्या कालावधीतच निगेटिव्ह आले आहेत. संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे.
मागील २४ तासांत देशात ३ लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील बहुतांश राज्यात ऑक्सिजन तुटवडा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठी समस्या बनली आहे. या परिस्थितीत Virafin चा वापर ऑक्सिजनसाठी पुरवठा म्हणून केला जाऊ शकतो. ज्यामुळे ऑक्सिजनच्या आवश्यकता असलेल्या रुग्णांमध्ये थोड्या प्रमाणात दिला मिळू शकतो.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांमध्ये राज्यवार घट दिसून येत आहे. २६ राज्यांमध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर सहा राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार येछे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरात येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.