परभणी येथून १४ वर्षीय बालिकेची ट्रेनमधून सिनेस्टाईल सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 08:39 PM2021-02-27T20:39:31+5:302021-02-27T20:40:58+5:30

Kidnapping एका महिलेने २३ फेब्रुवारी रोजी थांबल्यानंतर एका १४ वर्षीय बालिकेस आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.

14-year-old girl escapes from Parbhani by train | परभणी येथून १४ वर्षीय बालिकेची ट्रेनमधून सिनेस्टाईल सुटका

परभणी येथून १४ वर्षीय बालिकेची ट्रेनमधून सिनेस्टाईल सुटका

Next

हिंगोली : अपहरण झालेल्या एका १४ वर्षीय बालिकेची बासंबा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने २५ फेब्रुवारी रोजी परभणी येथून सुटका केली. तालुक्यातील चिंचोली येथे पाहुणी म्हणून आलेल्या महिलेने २३ फेब्रुवारी रोजी बालिकेला आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.

हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे एक महिला पाहुणा म्हणून आली होती. येथे २३ फेब्रुवारी रोजी थांबल्यानंतर एका १४ वर्षीय बालिकेस आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अपहरण झालेली १४ वर्षीय बालिका असल्याने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तत्काळ तपास हाती घेण्याच्या सूचना बासंबा पोलिसांना दिल्या. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांनी पथक कामाला लावले. पीडित मुलीचा शोध घेत असताना, आरोपी महिला व तिचा सहकारी मारोती डांगे हे तपोवन रेल्वेने नांदेडकडे येत असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, २५ फेब्रुवारी रोजी बासंबा पोलिसांच्या पथकाने परभणी रेल्वे स्थानकावर सापळा लावला. यावेळी नांदेडकडे जाणाऱ्या पाच रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली. तब्बल ७ तास थांबल्यानंतर रात्री मराठवाडा एक्स्प्रेसच्या समोरील डब्यात आरोपी महिला व तिचा सहकारी पीडित मुलीसोबत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, लागलीच पथकाने बालिकेची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, पो.ह. हराळ, पो.ह. गव्हाणे, पो.ना. प्रवीण राठोड, पो.शि. बंडू राठोड, म.पो.शि वंदना ढवळे यांनी केली, तसेच सायबर शाखेतील पो.ह. हलगे, पो.शि. सुमित टाले यांनी सहकार्य केले. दरम्यान, यातील आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: 14-year-old girl escapes from Parbhani by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.