आमदार निधीत ५ कोटी शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:54 AM2019-01-10T00:54:59+5:302019-01-10T00:55:21+5:30
जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ५१५ कोटी रुपये निधी खर्चास वाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ५१५ कोटी रुपये निधी खर्चास वाव आहे.
हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांचे यावर्षीचे २ कोटी तर समर्पित रकमेपैकी १.३७ कोटी प्राप्त झाले. त्यांना यापूर्वीच्या कामांसाठी २ कोटी राखीव ठेवावे लागणार आहेत. दीडपट कामांच्या हिशेबाने १.९३ कोटींचा खर्च करता येणे शक्य असताना १.७५ कोटींच्या त्यांनी सुचविलेल्या कामांची प्रशासकीय मान्यताही झाली. आता १८ लाखांचा वाव आहे. त्यांनी एकूण ४२ कामे सुचविली आहेत. कळमनुरीचे आ.संतोष टारफे यांना यंदाचे २ तर समर्पित निधीचे १.७२ कोटी मिळाले. अपूर्ण कामांवर १.९६ कोटींचा खर्च होणार असून दीडपटीत २.६३ कोटी खर्च करता येणार आहेत. त्यांनी सुचविलेल्या १.३९ कोटींच्या ३६ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. १.२४ कोटींचे नियोजन करणे शक्य आहे. वसमतचे आ.जयप्रकाश मुंदडा यांना यंदाचे २ कोटी व समर्पित प्राप्त निधी १ कोटी आहे. जुन्या अपूर्ण कामांसाठी १.३२ कोटी लागतील. दीडपटीत त्यांना २.५४ कोटींचा निधी खर्च करण्यास वाव आहे. त्यांनी १.९५ कोटींची ३३ कामे सुचविल्याने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता ५८ लाखांच्या कामांना त्यांना वाव आहे.
विधान परिषदेचे दोन आमदार जिल्ह्यात काम करतात. आ.विप्लव बाजोरिया यांना दीड कोटींचा निधी मिळाला असून त्यांनी ३८.८0 लाखांची १८ कामे सुचविली आहेत. तर आ.रामराव वडकुते यांना यंदाचे २ कोटी व समर्पित निधीपैकी १0३ लक्ष मिळाले. अपूर्ण कामांवर दीड कोटींचा खर्च होणार आहे. तर १0२ लक्ष किंमतीची ५७ कामे त्यांनी प्रशासकीय मान्यतेस पाठविली. त्यांना १.२७ कोटींची कामे सुचविण्यास वाव आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जणांनी निधी खर्च करण्यासाठी घाई चालविली आहे. तर काही जण हा निधी योग्यवेळी वापरण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. निवडणुकांमुळे अनेक गावांतून आमदार-खासदारांकडे निधीची मागणी करण्यास शिष्टमंडळे धाव घेताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वीच गावातील काम मार्गी लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. मात्र त्याच त्या कामांची मागणी करण्यात येत असल्याने त्यातही अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे अशी कामे केवळ प्रस्तावातच राहतात.
खासदारांना दरवर्षी ५ कोटींचा निधी मिळतो. यापैकी ३.९१ कोटींची कामे खा.राजीव सातव यांनी या आर्थिक वर्षात सुचविली आहेत. त्यामुळे अवघ्या १ कोटींच्या खर्चास वाव आहे. त्यांनी यंदा ९२ कामे सुचविली. यापैकी ५ पूर्ण तर २६ प्रगतीत आहेत. उर्वरित सुरूच झाली नाहीत.