हिंगोली : अवैध उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफियांना महसूल व पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. मागील १५ महिन्यांत हिंगोली तालुक्यातील ६७ प्रकरणात वाळू, मुरूम, दगडाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडून त्यांना १ कोटी ४ लाख ९४ हजार रुपयांचा दंड लावला आहे. या दंडापैकी ४१ लाख २८ हजारांचा दंड वसूलही करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
हिंगाेली तालुक्यातून कयाधू, पैनगंगा या मोठ्या नद्यांसह इतर छोटे-मोठे ओढे वाहतात. दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूही जमा होते. वाळू घाटाच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला महसूलही मिळतो. त्यामुळे गौण खनिजाचे अवैध उत्खनन रोखण्याकडे महसूल विभागाचे लक्ष असते. मात्र, तरीही वाळू माफिया नदी, ओढ्यातून वाळूचा उपसा करीत आहेत, तसेच मुरूम, माती, दगडाचे अवैध उत्खनन करणारेही माफिया सक्रिय आहेत. अवैध उत्खनन करून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या माफियांना रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या पथकाने मागील पंधरा महिन्यांत अवैध वाळू, मुरूम, दगडाची वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षात अवैध उत्खनन करून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात मुरूम, माती व दगडाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येकी एका टिप्परचा समावेश असून उर्वरित वाळूची वाहतूक करणारी वाहने आहेत. याप्रकरणी महसूल प्रशासनाने ६९ लाख ३ हजाराचा दंड लावला आहे. त्यापैकी २० लाख ८ हजाराचा दंड वसूल झाला आहे, तर १ एप्रिल ते जून २१ अखेर वाळू वाहतुकीचे १७, तर दगडाची वाहतूक करणारे एक वाहन पकडले. याप्रकरणी ३५ लाख ९१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी २१ लाख २० हजारांचा दंड वसूल झाला.
अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी ३४ गुन्हे
गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी ३४ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील २८ गुन्हे मागील आर्थिक वर्षातील, तर ६ गुन्हे चालू वर्षातील आहेत, तसेच मागील आर्थिक वर्षापासून आतापर्यंत ३७ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यात गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याप्रकरणीही एका गुन्ह्याचा समावेश आहे.