नांदेड जिल्ह्यातील बेटसांगवी येथील सोनटक्के कुटुंब वसमत येथे वीटभट्टीवर मागील बऱ्याच दिवसांपासून कामास होते. ६ मार्च २०२१ रोजी कौठा रोड येथील वीटभट्टीवर काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडल्याने प्रवाह सुरू असल्यामुळे काम करणाऱ्या पांडुरंग सोनटक्के व रामदास सोनटक्के या दोघांना विजेचा जबर धक्का बसला आणि दोन्ही पिता -पुत्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे सोनटक्के कुटुंबातील कमावते हात गमावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना शासन आणि महावितरण यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी, याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांना प्रत्येकी तत्काळ २० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी ३ लक्ष ८० हजार अशी एकूण ८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार आज खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते मयताच्या पत्नी राणी पांडुरंग सोनटक्के व कांताबाई रामदास सोनटक्के यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यासह नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, तालुकाप्रमुख राजू चापके, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, काशीनाथ भोसले, महावितरणचे अभियंता रामगिरवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .