रात्र गस्तीवरील पोलिसांच्या जीपचा अपघात; दोन कर्मचारी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 03:34 PM2021-03-02T15:34:32+5:302021-03-02T15:34:52+5:30
आखाडा बाळापुर ते रुद्रवाडी रस्त्यावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले.
आखाडा बाळापूर : रात्र गस्तीवर असलेल्या आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या जीपचा गंभीर अपघात सोमवारी मध्यरात्री रुद्रवाडी शिवारात झाला. यात जीपचे मोठे नुकसान झाले असून दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद शेख बन्ने, वाहन चालक पोलिस शिपाई सुखदेव जाधव हे जीपमधून रात्रगस्ती रवाना झाले होते. रात्री १२.२० वाजेच्या दरम्यान आखाडा बाळापुर ते रुद्रवाडी रस्त्यावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. गाडी तीन ते चार वेळा उलटली आणि रस्त्याशेजारी खड्ड्यात कोसळली. यात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार रवी हुंडेकर व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात चालक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे.
रुद्रवाडी शिवारात पोलीस जीप गेली कशाला ?
या कर्मचाऱ्यांची रात्रगस्त ही आखाडा बाळापूर शहर व मराठवाडा चौकात असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळाले .मग हे कर्मचारी जीप घेऊन रुद्रवाडी शिवारात कोणत्या तपासासाठी मध्यरात्री गेले ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. कोणाचा पाठलाग करण्यासाठी ही जीप तिकडे गेली ? व तिचा अपघात झाला. यावर चर्चा होत आहेत.