लोहरा येथील बोगस डॉक्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:43+5:302021-07-04T04:20:43+5:30
हिंगोली : तालुक्यातील लोहारा येथील एका बोगस डॉक्टरचा भंडाफोड करीत आरोग्य व पोलीस पथकाने ३ जुलै रोजी कारवाई केली. ...
हिंगोली : तालुक्यातील लोहारा येथील एका बोगस डॉक्टरचा भंडाफोड करीत आरोग्य व पोलीस पथकाने ३ जुलै रोजी कारवाई केली. वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत होता. याबाबत पथकाने पंचानामा केला असून, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
हिंगोली तालुक्यातील लोहरा शिवारात लोहारा ते लिंबी रस्त्यावर एका बोगस डॉक्टराने दवाखाना थाटला असून, तो रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होेती. त्यावरून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दवाखान्याची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, बासंबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार नानाराव पोले यांच्यासह महसूलच्या कर्मचाऱ्यांनी लोहरा ते लिंबी रस्त्यावरील दवाखान्यावर शनिवारी दुपारी छापा टाकला. यावेळी केशव धाडवे (रा. लोहरा) हे रुग्णांची तपासणी करीत होते, तर दोन महिलांना सलाइन लावण्यात आल्याचे पथकाच्या पाहणीत आढळले.
पथकाने बोगस डॉक्टराकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीबाबत विचारणा केली असता माहिती देता आली नाही. यावेळी दवाखान्यात औषधसाठाही आढळला. पथकाने पंचनामा केला असून, अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, केशव धाडवे यांना त्याच्याकडे असलेल्या वैद्यकीय व्यवसायासंबंधीची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरच गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कोरोनाकाळातही रुग्णांची करीत होता तपासणी
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये केशव धाडवे हा हिंगोली येथील एका रुग्णालयात कम्पाउंडर म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपासून त्याने लोहरा शिवारात दवाखाना थाटून प्रॅक्टिस सुरू केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या पदव्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच औषधांचा साठा कोठून आणला हेही तपासात स्पष्ट होणार आहे.