आखाडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतीपद कॉंग्रेसकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 06:11 PM2019-01-28T18:11:52+5:302019-01-28T18:13:59+5:30
जिल्ह्यामध्ये बहुचर्चित असलेल्या राजकीय चढाओढीत काँग्रेसने बाजी मारली
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : जिल्ह्यामध्ये बहुचर्चित असलेल्या राजकीय चढाओढीत काँग्रेसने बाजी मारली असून सभापती व उपसभापती या दोन्ही जागी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतीपदी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे सुपूत्र दत्ता संजय बोंढारे तर उपसभापतीपदी धृपत नारायण पाईकराव विजयी झाले आहेत.
बाजार समितीची निवडणूक जिल्हाभरात मोठी चर्चेची बनली होती. भाजपतर्फे माजी खासदार शिवाजी माने यांचे पुतणे दत्ता दिलीप माने रींगणात होते. तर काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचे चिरंजीव दत्ता संजय बोंढारे होते. मिनी विधानसभा म्हणून या बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले गेले. सेना-भाजप युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. १८ सदस्यसंख्येत १० विरुद्ध ८ अशी संचालकांची निवड झाल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला होता.
बोंढारे यांना ९ तर दत्ता माने यांना ८ मते पडले. एका मताच्या फरकाने दत्ता बोंढारे विजयी झाले. उपसभापतीपदासाठी भरत पंजाबराव देशमुख यांचा धृपत नारायण पाईकराव यांनी पराभव केला. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी काम पाहिले.