रुग्णवाहिकेच्या ३६ डॉक्टरांची जबाबदारी केवळ १७ डॉक्टरांवर; वैद्यकीय तक्रारी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 07:47 PM2019-11-08T19:47:19+5:302019-11-08T19:52:21+5:30
हिंगोली जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत.
- दयाशिल इंगोले
हिंगोली : गंभीर रूग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हिंगोली जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेचा कारभार ढेपाळला आहे. ३६ डॉक्टरांची या रूग्णवाहिकेत आवश्यकता असतानाही केवळ १७ डॉक्टरांवरच कारभार सुरू आहे. रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारीही वाढल्या आहेत.
गंभीर रूग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेत सध्या डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे रूग्णवाहिका सेवीची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीला याबाबत वारंवार पत्र पाठवून डॉक्टरांची पदभरणा करावी या संदर्भाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्र पाठविले आहे. परंतु सदर पत्राला कंपनीकडून अद्याप उत्तर मिळाले नाही. परंतु कंपनीकडून पदभरती संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातर्फे देण्यात आली. असे असले तरी मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेतील सेवेचा बोजवारा उडल्याने मात्र गंभीर रूग्णांचे हाल होत आहेत.
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालय अंतर्गत जिल्ह्यात एकूण १०८ क्रमांकच्या अत्याधुनिक सेवा असलेल्या १२ रूग्णवाहिका आहेत. या बाराही रूग्णवाहिकेत नियमानुसार ३६ डॉक्टर असणे आवश्यक आहे. जेणेकरून आठ तासांच्या शिप्टनुसार रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवा देताना अडचणी येणार नाहीत. परंतु १७ डॉक्टरच सध्या कार्यरत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणही येत आहे. त्यामुळे सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेचे नियोजनच कोलमडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेमुळे गंभीर रूग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपात्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेमुळे अनेकांचे प्राणही वाचले. परंतु सध्या व्यवस्थापनच कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात जिल्हा शल्यचिकित्सकही मागील काही दिवसांपासून ते आजारी रजेवर होते, परंतु ते रूजू झाले आहेत. त्यामुळे आता तरी रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभारावर नियंत्रण येईल का हाही प्रश्नच आहे. परंतु सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे मात्र गंभीर रूग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. अपघात किंवा इतरत्र कुठल्याही घटनेत गंभीर जमखी झालेल्या रूग्णांनाच्या मदतीला धावून जाणाऱ्या रूग्ण्वाहिकेतील सेवाच कोलमडली आहे.
१०८ रूग्णवाहिकेची जिल्ह्यात २०१४ पासून सेवा
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात १०८ क्रमांकची सेवा २०१४ पासून कार्यान्वीत आहे. मागील पाच वर्षांत जवळपास ६३ हजार ६५८ रूग्णांना १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदानही मिळाले आहे. ४परंतु मागील काही महिन्यांपासून १०८ रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सुविधेचे नियोजन कोलमडले आहे. शिवाय याबाबत नागरिक, रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीही वाढतच चालल्या आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असून तशी मागणी होत आहे.४जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील गोर-गरिब रूग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु जिल्हा रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभाराचा फटका त्यांना सहन करावा लागतो. याकडे मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी मात्र लक्ष देत नाहीत हे विशेष.
१०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटड्या संदर्भात संबंधित कंपनीला तसे पत्र पाठविले आहे. डॉक्टरांची पदभरणा करून घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून जिल्हा रूग्णालयाकडून वारंवार पत्रही पाठविण्यात आले आहेत.
- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास हिंगोली.