नर्सी नामदेव ( हिंगोली ) : संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेल्या नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ फेब्रुवारी रोजी पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या उपस्थितीत कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्यानिमित्त नर्सी या ठिकाणी प्रति पंढरी अवतरल्याचे चित्र दिसून आले.
श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. १ फेबु्रवारी रोजी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा उत्साहात साजर करण्यात आला. सकाळी ९ वाजत कलशाची विधीवत पूजा व आरती करून व नामदेव जनाबाई यांच्या जयघोषाने, पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या साक्षीने कलश मंदिराव चढविण्यात आला. संत नामदेव मंदिराच्या कलशारोहणसाठी हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, बुलढाणा, रिसोड, जिंतुर तसेच राज्य परराज्यातील लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. कलशारोहण सोहळा शांततामय व मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात पार पडला.
मंदिर जीर्णोद्धार समितीने चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने हे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर हिंगोलीकडे व सेनगावकडे जाणाऱ्या दुतर्फा दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाने भाविकांना वाट मोकळी करून दिली. कलशारोहण सोहळ्याला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गणी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
पोलीस बंदोबस्त दरम्यान २ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, ४५ पोलीस कर्मचारी, १० वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी व १ आरपीसी प्लाटून असा तगडा बंदोबस्त होता. यशस्वीतेसाठी मंदिर जीर्णोद्धार समिती, संत नामदेव मंदिर संस्थान, नर्सी नामवेद येथील ग्रामस्थ व हजारो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कलशारोहण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांची अलोट गर्दी नर्सी येथे झाली होती.