बाळापुरात लोकवर्गणीतून बसविलेल्या सीसीटीव्हीची सर्व यंत्रणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:20+5:302020-12-23T04:26:20+5:30
आखाडा बाळापूर : बाळापूर पोलिसांच्या पुढाकारातून लोकवर्गणी करून साडेचार ते पाच लाख रुपये खर्च करून संपूर्ण बाळापुर शहरा बसवलेल्या ...
आखाडा बाळापूर : बाळापूर पोलिसांच्या पुढाकारातून लोकवर्गणी करून साडेचार ते पाच लाख रुपये खर्च करून संपूर्ण बाळापुर शहरा बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर पूर्णतः बंद पडली आहे. एकाच रात्री दहा दुकाने फोडल्याच्या पार्श्वभूमीवर बंद सीसीटीव्हीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जनतेने सुरक्षिततेसाठी जमा करून दिलेला पैसा मातीमोल ठरला असून त्याकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे. केवळ देखभाल व दुरूस्तीच्या किरकोळ खर्चासाठी ही संपूर्ण यंत्रणा बंद पडली आहे.
आखाडा बाळापूर ही मोठी व्यापारपेठ असल्याने बाळापुर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांच्या पुढाकारातून संपूर्ण बाळापूर शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत घेण्यात आले होते. व्यापारपेठ फिरून पाच लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली होती. चांगल्या दर्जाचे ३२ सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या मुख्य ठिकाणांवर बसविण्यात आले होते. संपूर्ण बाळापूर शहर व व्यापारपेठ सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्याने चोऱ्यांचे व अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. परंतु काही काळानंतर सीसीटीव्हीची ही संपूर्ण यंत्रणा बंद पडली आहे. अनेक ठिकाणचे यंत्र निकामी झाले आहेत. त्याला नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात कोणीच रस दाखवला नाही .त्यामुळे पाच लाख रुपये खर्चून उभारलेली ही सीसीटीव्हीची यंत्रणा पूर्णतः बंद पडली आहे. २० डिसेंबर राेजी बाळापुरातील मुख्य बाजारपेठेतील दहा दुकाने चोरट्यांनी फोडून हैदोस घातला. तब्बल दोन तास व्यापारपेठेत धुमाकूळ घातला. त्यानंतर लोकांच्या पैशातून उभारलेली सीसीटीव्हीची नजर शोधण्याचा प्रयत्न केला गेला. तेंव्हा ही संपूर्ण यंत्रणा पूर्णतः बंद असल्याचे उघड झाले. परिणामी चोर खुलेआम दुकाने फोडत असले तरी त्यांच्या हालचाली कैद झाल्या नाहीत. पोलिसांना या यंत्रणेचा काहीच उपयोग झाला नाही. चोरट्यांचा मार्ग लावता आला नाही. याबाबत पोलिस प्रशासनाला विचारले असता दुरुस्तीसाठी निधी नसल्याने त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले. लोकांच्या पैशातून संपूर्ण बाळापूर शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आले होते. परंतु याची जबाबदारी कोणाकडेच नसल्याने दुरुस्ती व देखभालीसाठी लागणारा खर्च कुणी करावा? यावर कोणाचेही एकमत होत नाही. व्यापारी असोसिएशनच्या वतीने ग्रा.पं.ला वेळोवेळी हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची व दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली .परंतु ग्रा.पं. प्रशासनानेही निधी नसल्याचे सांगत हात झटकले. आता चोरीची भयंकर घटना घडल्यानंतर या सीसीटीव्हीची आठवण सर्वांना झाली आहे. परंतु बंद झालेल्या या सीसीटीव्हीच्या यंत्रणेला आता कोण दुरूस्त करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रीया
ग्रामपंचायत प्रशासनाने ही जबाबदारी घ्यावी - विलास अमिलकंठवार (अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन,आखाडा बाळापुर)
व्यापाऱ्यांनी निधी जमा करून सीसीटीव्ही ची संपूर्ण यंत्रणा उभारली आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी उभारलेली ही यंत्रणा ग्रामपंचायतीने देखभाल व दुरुस्ती करून व्यवस्थित सांभाळली पाहिजे .जनतेचा पैसा वाया जाऊ नये याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.