महामार्गावरील सोयाबीनच्या गंजीमुळे कार उलटली; भीषण अपघातात शिक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 03:47 PM2020-11-05T15:47:02+5:302020-11-05T15:47:28+5:30
रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावलेल्या दगडावरुन गेली आणि उलटली.
सेनगाव : सेनगाव -हिगोली मार्गावर तळणी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीमुळे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उलटली. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात कार चालवणाऱ्या शिक्षकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. तर शिक्षकाचा मुलगा आणि अन्य एकजण जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबाराव कुंडलीक कुदंरगे (४३)हे तालुक्यातील कवरदडी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. बुधवारी रात्री ते मुलगा ऋषी (१७ ) आणि योगेश अप्पासाहेब कुदंरगे (१७) यांच्यासोबत कारमधून (एमएच.०१ सीडी ६७७९ ) हिगोलीहून सेनगावकडे प्रवास करत होते. रात्री ९ वाजेच्या दरम्यान तळणी पाटीजवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावलेल्या दगडावरुन गेली आणि उलटली. वेग जास्त असल्याने लिंबाराव यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार दोनतीन वेळेस उलटत रस्त्याच्या बाजूला पडली.
या भीषण अपघातात कार पूर्णपणे दबली गेल्याने लिंबाराव कुदंरगे हे गंभीर जखमी झाले तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे नेत असतानाच शिक्षक कुदंरगे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रिसोड -सेनगाव-हिगोली मार्गावर शेतकरी खळे करण्यासाठी सरार्सपणे सोयाबीनच्या गंजी उभारत आहेत. यासाठी वापरलेल्या दगडामुळे अशा प्रकारे भीषण अपघात होत आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.