कळमनुरी शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४०४ घरकुल लाभार्थ्यांना केंद्र शासनाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:52 AM2021-02-05T07:52:06+5:302021-02-05T07:52:06+5:30
कळमनुरी: शहरातील, नुरी मोहल्ला मदिना नगर, इंदिरानगर जुन्या पाण्याची टाकीजवळील भाग, आठवडी बाजार या भागातील सरकारी जमिनीवर वास्तव्य असलेल्या ...
कळमनुरी: शहरातील, नुरी मोहल्ला मदिना नगर, इंदिरानगर जुन्या पाण्याची टाकीजवळील भाग, आठवडी बाजार या भागातील सरकारी जमिनीवर वास्तव्य असलेल्या ४०४ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
कळमनुरी शहरातील इंदिरानगर, मदिनानगर, पाण्याच्या टाकीजवळील भाग, आठवडी बाजार या भागातील अनेक वर्षांपासून राहात असलेल्या लोकांनी घरकुल मिळण्यासाठी नगर परिषदेकडे कागदपत्रांची पूर्तता करून संचिका दाखल केल्या गेल्या होत्या. यानंतर नगर परिषदेच्या वतीने मुख्य अभियंता प्राधिकरण महाराष्ट्र गृहनिर्माण यांच्याकडे २५ मे २०२९ रोजी ४०४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले होते. सदर प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासन व गृहनिर्माण विभागाकडून मंजुरी घेऊन यानंतर सदरचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल केले गेले.
केंद्र शासनाने या ४०४ लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या लाभार्थ्यांना घरकुल देण्याकरिता शासनाच्या निकषानुसार उपविभागीय अधिकारी कळमनुरी व भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे नगर परिषदेच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती स्थापत्य अभियंता सविता कुटे यांनी दिली. लाभार्थी राहात असलेल्या जागेचे सर्वेक्षण करून नियमानुसार त्यांना घरकुल बांधण्यासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचेही सविता कुटे यांनी सांगितले.
नगरसेवक मो. नाजीम रजवी यांच्या प्रयत्नांना यश
प्रधानमंत्री आवास योजनेतील काही तांत्रिक अडचणीमुळे शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेपासून वंचित राहावे लागत होते. या योजनेपासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नगरसेवक मो. नाजीम रजवी यांनी
सतत पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कच्च्या घरात राहणाऱ्या गोरगरिबांना पक्के घर मिळणार आहे.