लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळापासून काढलेल्या मिरवणुकीत तरुणाई हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती. शंभूराजांच्या जयघोषासह ढोल पथकाच्या आवाजाने हिंगोली दणाणली.हिंगोलीत दरवर्षी मराठा शिवसैनिक सेनेतर्फे संभाजी राजे जयंतीनिमित्त जंगी मिरवणूक काढण्यात येते. १४ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यामध्ये ढोल पथक हे सर्वांचे आकर्षण ठरत होता. रथावर आरुढ असलेल्या संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे, पप्पू चव्हाण, ढाले, मोरे व जिल्हाभरातून आलेल्या मावळ्यांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत भजनी मंडळी, वासुदेव, घोडेस्वार मावळे, ढोलपथक आदीचा समावेश होता. डीजेवरही तरुणाई जल्लोषात नृत्य करताना दिसत होती. छत्रपती संभाजी राजांच्या जयघोषाने शहर दणाणले. व्याख्यान कार्यक्रमास विनायक भिसे यांच्यासह बाळासाहेब दोडतले, प.पू.पाटील महाराज, महंत लोकेश चैतन्य महाराज, गजानन वाव्हळ, पांडुरंग गोरठेकर, पप्पू चव्हाण, गजानन भालेराव, ह.भ.प वैजनाथ थोरात आदी उपस्थित होते.मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने संभाजी राजे जयंतीनिमित्त सकाळी विश्रामगृहापासून भव्य मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले हजारो युवक सहभागी झाले होते. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावरून काढलेल्या या रॅलीने वातावरण भगवेमय झाले होते.तर भर दुपारी उन्हात निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांसह इतरांनीही यात सहभाग नोंदविला. काहींनी सरबत व मठ्ठाही ठेवला होता.आकर्षक वेशभूषेतील भजनी मंडळ व वासुदेव लक्ष वेधून घेत होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. त्यानंतर गांधी चौक भागात प्रा.डॉ. गजानन वाव्हळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.
छत्रपती संभाजी राजांना मिरवणुकीने वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:15 AM