छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने जिल्हा दुमदुमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:43 AM2019-02-20T00:43:56+5:302019-02-20T00:44:28+5:30
जिल्हाभरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची एकच गर्दी झाली होती. मिरवणूक, कलशयात्रा, पोवाडे तसेच चिमुकल्यांनी सादर केलेले शिवरायांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाभरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची एकच गर्दी झाली होती. मिरवणूक, कलशयात्रा, पोवाडे तसेच चिमुकल्यांनी सादर केलेले शिवरायांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेबु्रवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी साजरी करण्यात आली. हिंगोली शहरात छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागील अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची इच्छा होती. अखेर यंदा शिवरायांचा भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने यंदाच्या जयंतीत शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला. जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, महोत्सव समिती अध्यक्ष भूषण देशमुख, रमेशचंद्र बगडिया, प्रकाश सोनी, मनोज आखरे, डॉ.जयदीप देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शहरातील सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.
सकाळी यानिमित्त शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाली. त्यानंतर महिलांनी डोक्यावर कलश घेवून शोभायात्रा काढली. यात महिलांची मोठी संख्येने उपस्थिती होती. यात चिमुकल्यांचे लेझीम पथकही सहभागी झाले होते. तर समता सैनिक दलाच्या वतीने महिलांनी थरारक लाठी-काठी कवायती सादर केल्या. सर्वधर्म समभावाची झलक दाखविणारा देखावाही लक्षवेधी होता. संत, महात्मा, थोर पुरुषांच्या व्यक्तिरेखांप्रमाणे वेशभूषा करूनही अनेक चिमुकले आले होते.
दुपारी दीडच्या सुमारास पुतळा परिसरात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यातही महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तर पुतळा परिसरात शिवपोवाड्यांचा कार्यक्रमही झाला. शिवशक्ती भजनी मंडळाच्या मुलींनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. यासाठीही दिवसभर गर्दी असल्याचे चित्र दिसून येत होते. शहरातील सर्वच रस्त्यांवर भगवे झेंडे व फलक लावण्यात आले होते. तर व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला.
शहरातील विविध भागातूनही शिवप्रेमींना मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुका सायंकाळच्या सुमारास विविध देखाव्यांसह ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आल्या. भगव्या पताक्यांसह घोड्यांवर छत्रपती शिवराय व मावळ्यांचे देखावेही मिरवणुकांमध्ये दिसत होते. या लक्षवेधी देखाव्यांसोबत मार्गक्रमण करणाऱ्या मिरवणुकांनी वातावरण शिवरायमय झाले होते. शिवप्रेमींचा यंदा अभूतपूर्व जल्लोष पहायला मिळत होता. झेंडे लावून फिरणारे मोटारसायकलस्वार तर दिवसभर दिसत होते.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातही शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. शिवप्रेमी उत्स्फूर्तपणे यासाठी पुढाकार घेताना दिसत होते.