हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, काही जणांचे संचारबंदीतही फिरने थांबेना झाले आहे. नगर परिषद व पोलीस पथकाने मंगळवारी रिक्षाचालक व विनामास्क फिरणाऱ्यांकडून ८ हजार ३०० रुपये वसूल केले.
४ मे रोजी शहरातील अष्टविनायक चौक, इंदिराचौक, जवाहररोड, गांधी चौक, अग्रसेन चौक, शिवाजीनगर आदी भागांत नगर परिषद व पोलीस विभागाने संयुक्त कारवाईस सकाळी १० वाजता सुरुवात केली. कारवाई दरम्यान १६ रिक्षाचालक हे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रिक्षा चालवित असल्याचे आढळून आले. काही रिक्षाचालकांनी तर मास्कही वापरला नव्हता. संचारबंदीत बाजारात किंवा इतर ठिकाणी फिरू नये, असे आदेश असतानाही काही जण बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसून आले. १६ रिक्षाचालकांकडून तीन हजार २००, तर विनामास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून ४ हजार ८०० दंडापोटी वसूल करण्यात आले.
ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पंडितराव मस्के, नितीन पहिनकर, पोलीस कर्मचारी शेख शकील, पोलीस कर्मचारी होळकर यांनी केली.
संचारबंदीत फिरू नये
कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू केली आहे. विनामास्क व विनाकारण कोणीही गावात फिरू नये. दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.