हिंगोली नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे ट्रॅक्टर वाहन शहरातील पेन्शनपुरा भागात २३ जून रोजी नेहमीप्रमाणे गेले होते. काही नागरिकांच्या घरातील कचरा जमा केल्यानंतर हे ट्रॅक्टर गीता रवि नर्लेकर यांच्या घरासमोर गेले होते. यावेळी गीता नर्लेकर यांच्या घरातील वयोवृद्ध महिलेने घरातील कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकला. यासोबत कचरा समजून त्यांनी गीता नर्लेकर यांनी एका पिशवीत ठेवलेले सोने, चांदीच्या दागिन्यासह दहा हजाराची रक्कमही कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये टाकली. गीता नर्लेकर यांना सोने, चांदी व रोख रक्कम ठेवलेली पिशवी घरात दिसत नसल्याने त्यांनी वयोवृद्ध महिलेला विचारणा केली. त्यावेळी ही पिशवी कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये टाकल्याचे सांगितले. हे ऐकून गीता नर्लेकर यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला विचारपूस करून कचरा कुठे टाकला जातो याविषयी माहिती घेतली. तसेच घडलेला सगळा प्रकार सफाई कर्मचाऱ्यांना सांगितला. महिलेची तळमळ पाहून सफाई कर्मचाऱ्यांनी लिंबाळा येथील डम्पिंग ग्राउंडवर जाऊन कचऱ्यामध्ये पाहणी केली. त्या कचऱ्यांतून महिलेची कचऱ्यात आलेली पिशवी शोधून दिली. दागिन्यांची पिशवी पाहून गीता नर्लेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो : १८