काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:33 PM2019-03-01T23:33:28+5:302019-03-01T23:33:45+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.

 Congress tranquility, senate lathale | काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा.राजीव सातव यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच आ.संतोष टारफे यांनी काही भागात दौरे केले अन् काँग्रेसमध्ये हलचल सुरू झाली. मात्र इतर कोणी पुढे येणे तसेही शक्यच नाही. परंतु खा.सातव इच्छुक नसतील तर या जागी आपल्याला संधी मिळेल काय? याची चाचपणी काही जणांनी केली. यात कुणाच्याच हाती काही लागले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती गृहित धरूनच या सगळ्या बाबी होत गेल्याने राष्ट्रवादीतून कोणी इच्छुक नव्हता, ही एक जमेची बाजू. दुसरीकडे भाजप व शिवसेना मात्र स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा वारंवार करून पुढाऱ्यांना चेतविण्याचे काम करीत होती. यात भाजपकडे तर इच्छुकांचा इतका भरणा झाला की, ही जागा शिवसेनेपेक्षाही ताकदीने हीच मंडळी लढविणार की काय? असे चित्र निर्माण झाले होते. अ‍ॅड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील या तीन माजी खासदारांसह अ‍ॅड.शिवाजी जाधव, के.के.शिंदे, आ.तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर व शेवटच्या टप्प्यात तर माजी आ.गजानन घुगे हेही दावेदारी करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच काळात युतीची घोषणा झाली अन् भाजपवाल्यांना या जागेवर पाणी सोडावे लागेल, याची जाणीवही झाली. मात्र दुसरीकडे शिवसेनेत याचदरम्यान आ.जयप्रकाश मुंदडा यांच्याऐवजी आ.हेमंत पाटील, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या नावाचा काहींनी आग्रह चालविला होता. यात पाटील व मुंदडा यांचे शिष्टमंडळ पार मातोश्रीपर्यंत धडकले होते. युतीमुळे इतरही अनेकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. जिल्हा परिषदला जागा निवडून न आणणारेही आमच्या हिंगोलीवर कायम अन्यायाची भाषा करू लागले. तसा विचार करता सेनेची हिंगोली विधानसभेतही स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे येथेही पत्रकार परिषद घेवून दावेदारी करणाऱ्यांचा उत आला आहे.
सेनेच्या इच्छुकांची रांग हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत चालली आहे. आ.मुंदडा, आ.पाटील यांच्यासह प्रकाश देवसरकर, बी.डी.चव्हाण, रामेश्वर शिंदे, पंडित शिंदे, नागेश पाटील, बाबूराव कदम कोहळीकर अशी अनेक नावे समोर येत आहेत. शिवसेनेत मात्र उमेदवार ठरण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या लाथाळ्या वाढणार आहेत. त्यामुळे पक्षाने एकदाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.
या राजकीय खेळात दोन वकील हैराण आहेत. अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या नावाची आधी काँग्रेसकडून तर आता सेनेकडून चर्चा होत आहे. एवढेच काय तर ते मातोश्रीवर जावून आले. सेना मराठा कार्ड वापरणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. तर अ‍ॅड.शिवाजी माने हे वंचित अथवा बसपाची उमेदवारी मिळवितील, अशा कंड्या पिकत आहेत. मात्र या दोघांनीही आम्ही भाजपमध्येच आहोत. ही जागा भाजपला मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. तर अ‍ॅड.जाधव यांनी अपक्ष म्हणून चाचपणी करतोय, असे सांगितले.
इच्छुकांमध्ये पुढे असलेल्यांत वकील व डॉक्टरच दिसत आहेत. काँग्रेसचे विद्यमान खा.सातव तर दुसरे इच्छुक संतोष टारफे डॉक्टर आहेत. भाजपमध्ये शिवाजी माने व शिवाजी जाधव हे वकील आहेत. शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा व बी.डी. चव्हाण हेही डॉक्टर आहेत.

Web Title:  Congress tranquility, senate lathale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.