महाविकास आघाडीचे सोयीने साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:54+5:302021-08-15T04:30:54+5:30

हिंगोली : जिल्ह्यात महाविकास आघाडीत मोठी धुसफूस नसली तरीही सोयीनुसार एकमेकांची साथ घेतली जाते. मात्र गरज पडली तर कधी-कधी ...

With the convenience of Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीचे सोयीने साथ-साथ

महाविकास आघाडीचे सोयीने साथ-साथ

Next

हिंगोली : जिल्ह्यात महाविकास आघाडीत मोठी धुसफूस नसली तरीही सोयीनुसार एकमेकांची साथ घेतली जाते. मात्र गरज पडली तर कधी-कधी भाजपच्याही हातात हात घातला जात असल्याचे विचित्र चित्र पहायला मिळते.

जिल्हा परिषदेमुळे हे चित्र निर्माण झाले आहे. जि.प.त भाजप विरोधक म्हणून एकटाच सत्तेबाहेर आहे. मात्र येथे भाजपचा वापर सत्ताधारी आपल्या सोयीप्रमाणे करून घेतात. ज्यांना आपले इप्सित साधायचे ते भाजपला सोबत घेतात, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. तरीही महाविकास आघाडीही कायम आहे आणि विरोधक म्हणून भाजपही जागीच आहे. कधी कधी महाविकास आघाडीत भांडणे लावण्यासाठी भाजपही एखाद्याला साथ देते. मात्र आमदार व त्यावरील नेत्यांत शिवसेना व काँग्रेसमध्ये दरी दिसून येते.

जिल्हा परिषद

हिंगोली जि.प.त शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तेत आहे. मात्र काँग्रेसचा एक गट सत्तेबाहेर असल्याने विरोधात आहे. तर भाजपची सोयीनुसार साथ घेतली जाते. त्यामुळे नेमकी आघाडीची कोणती खिचडी कधी शिजली हेच कळत नाही.

पंचायत समिती

पंचायत समित्यांमध्ये बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने आघाडीचा धर्म पाळला आहे. काही ठिकाणी एकहाती सत्ता असल्याने त्या पक्षांना इतरांची गरजच नसल्याचे चित्र आहे.

नगरपालिका

नगरपालिकांमध्येही सोयीनुसारच राजकारण आहे. महाविकास आघाडीपेक्षा संख्याबळाच्या गणितानुसार संगती झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून एका पक्षाचा तर उपनगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा असेही चित्र आहे.

तीन पक्ष, तीन विचार

शिवसेनेची हिंदुत्ववादी विचारसरणी असली तरीही हिंगोलीत अनेकदा हा पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेत आल्याचे पहायला मिळाले. त्यातच राज्यात सेना भाजपसोबत असताना हिंगोलीत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्यास पसंती दिली.

काँग्रेसची हा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कायम राष्ट्रवादीसोबत जाण्यास इच्छुक असते. समान विचारधारेवर हे पक्ष चालत असले तरीही या दोन्हींमध्ये काही ठिकाणी समन्वयाची अडचण आहे. त्यामुळे एकमेकांशी पाठ आहे.

राष्ट्रवादीचीही धर्मनिरपेक्ष विचारसरणी असली तरीही सत्तेत येताना या पक्षाला फारसे कोणीच वर्ज्य नसते. हे मागील काही दिवसांत अनेकदा दिसून आले. मात्र सध्या महाविकास आघाडीचा धर्म पाळताना दिसतात.

पक्षांचे जिल्हाप्रमुख म्हणतात...

महाविकास आघाडी अभेद्य आहे. एकमेकांना विश्वासातही घेतले जाते. घर म्हटले की, कुरबूर असते. तशा काही बाबी कधीतरी घडतात.

संतोष बांगर, शिवसेना

काही कुरबुरी आहेत. मात्र राज्यात जसा एकोप्याने कारभार सुरू आहे. तसा जिल्ह्यातही सुरू राहावा, अशी अपेक्षा आहे.

संजय बोंढारे, काँग्रेस

महाविकास आघाडीतील सर्व घटक सोबत आहेत. एकमेकांना सोबत घेऊन चालण्याचीच सर्वांची भूमिका आहे. कुठेच वाद दिसत नाहीत.

दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी

Web Title: With the convenience of Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.