हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव केले. मात्र, या लाटेत असो वा पहिल्या लाटेत इतर गंभीर आजार असलेल्यांचेच मृत्यू ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे. ७० टक्क्यांपेक्षाही जास्त रुग्णांना इतर आजार असल्यानेच कोरोनात ते तग धरू शकले नाहीत. शिवाय मृतांत वृद्धांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५१ ते ७० या वयोगटातच तब्बल २३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असणारेही तब्बल मृतांमध्ये २२५ जण होते. त्यानंतर हृदयविकार असलेल्यांना मृत्यूने गाठल्याचे दिसत आहे. यामुळे या आजारात कोणी किती गांभीर्य पाळणे गरजेचे आहे, हेच ही आकडेवारी सांगत असल्याचे दिसून येत आहे. तरीही अनेक जण विविध गंभीर असतानाही सध्या कोरोनाचा कहर कमी झाल्याने विनामास्क बाहेर फिरण्यात मश्गूल असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी कोणतीच खबरदारी घेतली नाही, अशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फटका बसला, तसेच कुटुंबातील अनेक सदस्यांना एकाचवेळी दाखल होण्याची वेळ आली होती. त्यात ज्येष्ठांनाच कोरोनाने लक्ष्य केल्याचे दिसले.
विलंबाने उपचारास आल्याचा अनेकांना फटका
रुग्णालयात दाखल होण्यासाठी टाळाटाळ करणेच अनेकांना महागात पडले. काही जण आजार अंगावर काढण्याच्या नादात वेळेत दाखल होत नव्हते. त्याचबरोबर तपासणीचीही भीती वाटत असल्याने अनेकांनी टाळले. त्याचबरोबर ऑक्सिजन तुटवडा, औषधी तुटवडा आदी कारणांनी भीतीमुळे केलेला विलंब नंतर अंगलट आला. काही जण तर दाखल करून ४८ तास होत नाहीत तोच दगावले.
सर्वांत जास्त रुग्ण मधुमेहाचे
जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहाचे असून, त्यांची संख्या १२१ आहे. आधीपासूनच या रुग्णांना आरोग्य विभागाकडून इशारा देण्यात आला होता. तरीही हे लोक काळजी न घेतल्याने बळी पडले.
रक्तदाबाचे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही त्याखालोखालच असून, या रुग्णांनाही तसा इशारा दिला होता. १०४ जण रक्तदाब असताना कोरोना झाल्याने दगावले, तर ६२ हृदय रुग्णांचा घात झाल्याचे दिसून येते.
२ वर्षांची एक मुलगीही दगावली, तर ४१ ते ७० या वयोगटातीलच तब्बल २७५ जण दगावले असून, एकूण मृत्यूच्या ६० टक्क्यांवर हे प्रमाण आहे.
कोणत्या आजाराचे किती रुग्ण
मधुमेह : १२१
रक्तदाब : १०४
हृदयविकार : ६२
लिव्हर आजार : ११
कॅन्सर : २
टीबी : २