कोरोनामुळे हिरावले ४० बालकांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:21 AM2021-06-03T04:21:46+5:302021-06-03T04:21:46+5:30
हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने ...
हिंगोली : कोविडमुळे जिल्ह्यातील ४० बालकांचे पालकत्व हिरावले असून, यामध्ये ३१ जणांनी वडील, ८ जणांनी आई, तर एका बालकाने आई आणि वडील दोघेही गमावले असून, या बालकांच्या योग्य बालसंगोपनासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली. कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, ॲड. वैशाली देशमुख, सरस्वती कोरडे आणि बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी शिंदे यांनी जिल्ह्यात पालकत्व गमावलेल्या ४० बालकांचा शोध घेतल्याचे सांगितले. ही सर्व बालके आपले काका-काकू, मामा-मामी आणि आजी-आजोबांकडे सध्या वास्तव्यास आहेत. भविष्यात या बालकांचे नातेवाईक आपल्या जवळ ठेवण्यास तयार नसल्यास त्यांना बालसंगोपनगृहात ठेवून त्यांचे संगोपन करण्यात येईल, अशी माहिती दिली.
यावेळी जयवंशी म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी आपले पालकत्व गमावले आहे. यात एक किंवा दोन्ही पालक गमावलेले, तसेच ज्या बालकांनी कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे आपले पालकत्व गमावले असेल त्यांचीही माहिती संकलित करावी, तसेच सदर माहिती दैनंदिन पोर्टलवर अद्ययावत करावी. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील त्यांचे बालसंगोपन योजनेतून संगोपन करावे.
एकच पालक बाधित असल्यास मुलांना सांभाळा
ज्या बालकांचे एकच पालक आहे आणि ते विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत, अशांची माहिती दररोज जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, तसेच या कालावधीसाठी त्यांचे संगोपन करावे. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांना पोलीस विभागाने संरक्षण उपलब्ध करून द्यावे. त्यांचे शोषण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या हेल्पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहनही जयवंशी यांनी केले.