६ स्ट्रेचर असूनही एकही स्ट्रेचर रुग्णांच्या कामी येईना, व्हिलचेअर कोपऱ्यात पडून
हिंगोली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे डॉक्टरमंडळींसह इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाचाच गवगवा करी आहेत. या प्रकारामुळे मात्र इतर रुग्णांचे मात्र बेहाल होताना दिसून येत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे गरिबांचा दवाखाना म्हणून पाहिले जाते. परंतु, सद्य स्थितीत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही, हे दिसून येत आहे. १६ जुलैरोजी सकाळी अकरा ते साडेअकराच्यासुमारास दातदुखी, पोटदुखी, पायाला मार लागलेले, डोळ्याला मार लागलेले रुग्ण ओपीडीच्या बाहेर डॉक्टर आले नसल्यामुळे बसलेले पाहायला मिळाले. जिल्हा रुग्णालयात नेत्रविभाग, बाह्य विभाग, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग विभाग आदी जवळपास १७ ओपीडी आहेत. या ओपीडीची वेळ सकाळी ९ ते १२ अशी आहे. परंतु, एक-दोन डॉक्टर वगळता इतर डॉक्टर मंडळी आपल्या सवडीप्रमाणे ओपीडीमध्ये येऊन रुग्णांची तपासणी करतात, हे दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे सर्वत्र कोरोनाचाच गवगवा केला जात आहे. परंतु, बहुतांश रुग्णांनी मास्क काही घातलेला नव्हता. मास्कबाबत ना गार्डने विचारणा केली, ना डॉक्टर मंडळींनी, ना परिचारिकांनी. रुग्ण व नातेवाईक सर्रासपणे वावरताना दिसून येत होते.
जिल्हा रुग्णालय गरिबांसाठी आहे. येथे रुग्णांना चांगली सेवा देण्यात येते, असे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण येथे उपचार करून घेण्यासठाी येतात. परंतु, दोन-दोन तास या रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहात बसावे लागत आहे.
अतिगंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ६ व्हिलचेअर व ६ स्ट्रेचरची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, एकही स्ट्रेचर रुग्णांच्या कामी येत नाही. खरे पाहिले तर रुग्णालयाने नेमलेल्या स्ट्रेचरने ओपीडीबाहेर थांबायला पाहिजे. परंतु, हे स्ट्रेचर ओपीडीबाहेर न थांबता इतर कामे करताना दिसून येत आहेत. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत रुग्णाला डॉक्टरांजवळ न्यावे लागत आहे.
आडगाव येथील उत्तम हनवते (रा. आडगाव) आणि सुवर्णा अवधूत पोले (रा. सुरेगाव) या दोन रुग्णांच्या पायाला मार लागला होता. मलमपट्टी करण्यासाठी हे दोन रुग्ण रुग्णालयात आले होते. रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांनी स्ट्रेचरची विचारपूस केली,परंतु, सहापैकी एकही स्ट्रेचर त्यांना उपलब्ध झाला नाही. यानंतर त्यांनी स्ट्रेचरमध्ये रुग्णाला बसवून स्वत: स्ट्रेचर ओढत डॉक्टरांची ओपीडी गाठली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मळमळ होणे, डोके दुखणे व इतर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया...
जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. रुग्णांना दोन-दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. डॉक्टर मंडळी अस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूस करीत नाहीत.
- गजानन हनवते, नातेवाईक
स्ट्रेचरमध्ये रुग्ण बसवून खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर गेलो. तेथे विचारणा केली असता, डॉक्टर खाली आहेत, असे सांगितले. त्यामुळे स्ट्रेचरसह परत खाली आलो. अर्धा तास डॉक्टरांची विचारपूस केली. परंतु, लवकर डॉक्टर भेटले नाहीत.
- अवधूत पोले, नातेवाईक
डॉक्टर मंडळींनी ओपीडीच्या ठिकाणी बसणे गरजेचे आहे. कोणता रुग्ण कोणत्यावेळेस येईल, हे सांगता येत नाही. रुग्णांची काळजी न करता नेमलेले डॉक्टर व स्ट्रेचर जागेवर बसत नाहीत.
- राजेश देशमुख, नातेवाईक
...तर स्ट्रेचरवर कारवाई केली जाईल
अतिगंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात सहा स्ट्रेचर व सहा कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना ओपीडीबाहेर बसण्याची सूचना दिलेली आहे. नेमलेले स्ट्रेचर जर ओपीडीबाहेर बसत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे कर्मचारी रुग्णांची सेवा करत नसतील, तर त्यांना बदलून दुसऱ्या कर्मचाऱ्यांची तेथे नियुक्ती केली जाईल.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
फोटो