हिंगोली : सध्या कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवायची भीती वाटत आहे, तर घरात बसून मुले कंटाळत असून, टीव्ही व मोबाइल सोडायला तयार नाहीत. यातच घरी राहून जास्त खाद्यपदार्थ खाण्यात येत असल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असून, पालकांसमोर ही नवी चिंता वाढत आहे.
मागील दीड ते दोन वर्षांपासून मुलांना कोरोनामुळे घराबाहेर फिरून खेळण्यास जणू बंदीच असल्याची स्थिती आहे. पालक कामात व्यस्त असल्याने वीकेंडला तेवढी मुले घराबाहेर पडतात. एरवी घरातच राहणारी मुले ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइलसमोर अथवा विविध कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्हीसमोरच राहत आहेत. यादरम्यान ते मोबाइल पाहत अथवा टीव्ही पाहतच जेवण करीत असल्याने त्यांच्यात लठ्ठपणा येत आहे. जेवताना आपण किती जेवतोय, याचेच भान टीव्ही पाहताना राहत नाही. त्यातच व्यायाम बंदच झाल्यात जमा झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पालकांना आता शाळा कधी सुरू होतील व कोरोनाचा कहर कधी संपेल, याची चिंता लागली असल्याचे दिसून येत आहे.
वजन वाढले कारण...
मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून, घरातच जास्त राहत असल्याने खूप पदार्थ खायला मिळू लागले आहेत.
टीव्ही पाहत जेवण करण्याची सवय जडू लागली असून, यात ते गरजेपेक्षा जास्त खात असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणही ऑनलाइन झाल्याने बाहेर पडण्यासाठी कोणताच वाव राहिला नसून, व्यायामही करीत नाहीत.
फास्ट फूडचा वापरही पूर्वीपेक्षा अधिक वाढत असून, घरी राहत असल्याने हट्टामुळे ते सहज मिळत आहे.
वजन कमी करण्यासाठी
ही घ्या काळजी
मुलांचे वजन कमी करण्यासाठी त्यांना घरातील लहान-सहान कामे सांगून त्यात गुंतवून ठेवले पाहिजे. घरातल्या घरात खेळू दिले पाहिजे.
आता मैदाने खुली झाली असल्याने पालकांनी त्यांना सुरक्षितता बाळगून खेळायला नेले पाहिजे. व्यायाम, प्राणायाम करायला शिकविले पाहिजे.
टीव्ही व मोबाइल हे वजन वाढण्यास सर्वाधिक कारणीभूत असून, यासाठी ठरावीक अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मुलांना मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.
मुले टीव्ही मोबाइल सोडतच नाहीत
सध्या शाळा बंद आहेत. ऑनलाइनसाठी मोबाइल हातात मिळतोच. त्यानंतर गेम खेळतात. ते झाले की टीव्ही बघतात. बाहेर खेळायला जाणे अवघड झाल्याने मुलांचे वजन वाढण्याची समस्या जाणवत आहे.
-अजय बियाणी, पालक
मुलांना ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलपासून दूर ठेवता येत नाही, तर कोरोनामुळे बाहेर पाठवता येत नसल्याने टीव्हीला चिकटून बसत आहेत. आता शाळा सुरू झाल्या तरच मुलांच्या वजनवाढीची समस्या सुटेल, असे दिसते.
-राजेश वालाले, पालक
लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...
मुलांना टीव्ही व मोबाइलचे वेड लागत आहे. त्यातच टीव्हीसमोर बसून जेवू दिले, तर मुलांना जेवणाचे भान राहत नाही. त्यामुळे हे टाळले पाहिजे. घरची लहान- सहान कामे व व्यायामाद्वारे त्यांच्यातील लठ्ठपणा टाळणे गरजेचे आहे.
-डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ
टीव्ही व मोबाइलपासून मुलांना दूर ठेवून पालकांनी त्यांच्यासोबत इनडोअर गेम खेळले पाहिजे. कौटुंबिक सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून मुलांचे असे बौद्धिक व शारीरिक खेळ घेतले, तर ही समस्या राहणार नाही. त्यांना वेळही देता येईल.
-डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ