जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:40+5:302021-03-01T04:33:40+5:30
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २७ फेब्रुवारी राेजी नव्याने ४६ रुग्ण आढळले ...
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २७ फेब्रुवारी राेजी नव्याने ४६ रुग्ण आढळले आहेत. तरीही नागरिक मात्र त्या तुलनेत काळजी घेत नसल्याचे दिसून येत होते. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा १ मार्च ते ७ मार्चदरम्यान संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व आस्थापना, दुकाने, खानावळी आदी १ मार्चच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुभा दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ये -जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु, सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे. औषधी दुकानेही चालू ठेवण्यास मुभा राहील. पत्रकार व त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र ठेवून वार्तांकनाची मुभा आहे. रस्त्यांची कामे, महावितरण, महापारेषणची कामे, पाणीपुरवठा, दूरसंचारची कामे, स्वच्छता, परवानगीप्राप्त वाळू घाटातून वाळू वाहतुकीला मुभा राहणार आहे. पेट्राेलपंपही सुरू राहतील. संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर, मास्क वापरणे बंधनकारक राहील. याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारामध्ये गल्लीत, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.