हदगाव (जि. नांदेड) : तामसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या संरक्षक भिंतीची टोकदार गजाळी पोटात घुसून जगदीश गजानन गजभारे (१४) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २४ जुलै रोजी घडली़ मयताच्या कुटुंबियांनी शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
जगदीश हा आठवीत शिकत होता़ बुधवारी दुपारी दुसऱ्या सत्रातील शाळा भरण्यापूर्वी हा प्रकार शाळेच्या मागे असलेल्या संरक्षक भिंतीजवळ घडला़ शिक्षकांनी ताबडतोब शाळेसमोर असलेल्या पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली़ घटनास्थळ अत्यंत अवघडलेले असल्यामुळे जगदीशला बाहेर काढताना प्रयत्न करावे लागले. ज्या जागी ही घटना घडली तिथे तो केव्हा व का गेला होता? याबाबत तर्कवितर्क चालू असून भिंतीवर चढल्यानंतर त्याचा पाय घसरला व टोकदार गजाळी पोटात घुसली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपचारासाठी नांदेड येथे हलविताना त्याची प्राणज्योत मालवली.
कारवाईची मागणीजगदीशची आई व नातेवाईकांनी या घटनेला प्रभारी मुख्याध्यापक व शालेय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून जगदीशच्या शवविच्छेदनाला विरोध केला़ त्यामुळे तणाव वाढत गेला़ दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.