लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील न.प.ने मालमत्ता करात मोठी वाढ केलेली आहे ही वाढ करताना सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून नागरिकावर प्रचंड कराचा बोजा लादला आहे. या वाढीव घरपट्टीला कायदेशीर व रस्त्यावर उतरून नागरिकांंसोबत अंदोलनाच्या मागार्ने विरोध करण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीत ३१ जानेवारी रोजी घेण्यात आला.नगरपरिषदने घरपट्टीत मोठी वाढ केलेली आहे, या वाढीव घरपट्टी वर नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपांना केराची टोपली दाखवून कर आकरण्याची प्रक्रिया पुढे रेटत आणली आहे. आता तर न. प. अधिनीयमातील १५० अन्वये कर मागणीची नोटीस देऊन त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. मालमत्ता कर आकारणी करताना नगर परिषद पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या मालमत्तेला वेगळा कर व सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेला अवास्तव कर लावलेला असून मालमत्ता कराची आकारणी करणाºया कंत्राटदाराने अनेक घरांचा सारखा आकार असताना कमी अधिक मालमत्ता कर आकारला आहे. नागरिकांनी हा वाढीव मालमत्ता कर भरण्याआधी यावर एकत्रितरीत्या चर्चा घडवून आणावी यासाठी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अन्यायग्रस्त मालमत्ता करधारकांची बैठक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित केली आहे. यात मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरावा किंवा नाही याबाबतीत चर्चा होणार असून अंदोलनाची दिशाही ठरविण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. कर आकारणीवर आक्षेप घेण्यासाठी विहित मुदतही दिली नसल्याचीही ओरड आहे. सध्या पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधन्यास अनेकांना मालकी हक्काची नं.८ रिव्हीजन रजिष्टरला नोंद नसल्यामुळे या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. एकीकडे शासनाने शासकीय व सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणे नियमीत करण्याचे आदेश न.प. ला दिलेले आहेत. तर मालकीची जागा असताना न.प. रेकॉर्डला नाव नाही म्हणून योजनेचा लाभ न घेता येणाºयांनीही बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने केले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप जिंतूरकर, नंदकिशोर मणियार, नंदकिशोर सारडा, सोनबा बुरसे, तनवीर नाईक, बंडू बुरसे, शरद सोनी, गोविंद सारडा, पंकज सोमाणी, गजानन खोतकर, म. साजिद अली, जावेद पठाण, सुहास गुंजकर, राम सवणे, विठ्ठल शिंदे, रावसाहेब शिंदे, नंदू इंगोले, गजानन मस्के, आबासाहेब लोंढे, हमीदुल्ला पठाण, नरेंद्र रेखावर, विलास भोस्कर आदी उपस्थित होते.
मालमत्ता कराला आव्हान देण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 1:06 AM