डेल्टा प्लस विषाणूने घटविली बाजारपेठेची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:57+5:302021-06-28T04:20:57+5:30
जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळ, बेकरी, मिठाई, चिकन, मटण, अंडी, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगामपूर्व साहित्य विक्रेते यांची दुकाने ...
जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळ, बेकरी, मिठाई, चिकन, मटण, अंडी, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगामपूर्व साहित्य विक्रेते यांची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत चालू ठेवता येतील. दूध विक्री केंद्रांना सकाळी ६ ते ९ व सांयकाळी ६ ते ९ पर्यंत मुभा दिली. ई-कॉमर्स, कुरिअर दैनंदिन चालू राहतील. बाजार समिती, कृषी संबंधित खते, बियाणे, अवजारे आदींसह दुरुस्तीची दुकानेही सकाळी ९ ते सायं. ४ याच वेळेत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना दुकानांनाही तीच वेळ दिली. या वेळेतच खानावळ, रेस्टॉरंट यांना कोरोना नियमांचे पालन करून ५० टक्के उपस्थिती मर्यादेत उघडण्यास परवानगी दिली. मात्र शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. खाजगी कार्यालये दुपारी ४ पर्यंत चालू राहतील. खासगी बँका, विमा कंपनी, औषधी संबंधित कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था गैरबँकिंग वित्त संस्था मात्र नियमित सुरू राहतील. शासकीय कार्यालयात क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. मात्र अत्यावश्यक सेवा पूर्ण क्षमतेने चालतील.
लग्नसमारंभ शक्यतो कोर्ट मॅरेज व शक्य नसल्यास वधू-वरांसह ५० जणांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगीची गरज नाही, अन्यथा तहसीलला पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहील. अंत्यसंस्कारासाठी २० जण उपस्थितीला परवानगी असेल.
जिल्ह्याबाहेर खासगी वाहन, टॅक्सी, बस, रेल्वेने प्रवासाची परवानगी असेल. मात्र, राज्यातील स्तर ५ मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी अथवा त्या जिल्ह्यातून प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असेल. महामंडळाच्या बस पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकतील. मात्र, प्रवासी उभे राहून प्रवास करता येणार नाही. मास्कचा वापर अनिवार्य आहे. मालवाहतुकीसोबत केवळ तीन व्यक्तींना परवानगी राहील. खासगी, शासकीय बांधकामांनाही परवानगी राहणार आहे. बँका नियमित वेळेत सुरू राहणार असून, उद्योगही कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.
धार्मिक स्थळे, शाळा बंदच
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, जत्रा, यात्रा, उरूस, मिरवणुका आदींना पुढील आदेशापर्यंत बंदी कायम आहे. तर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. ऑनलाईन वर्ग घेण्यास परवानगी असेल. जिल्ह्यात आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चे यांना पूर्णपणे बंदी असेल. सिनेमा हॉल व मल्टिप्लेक्सही बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडासह कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.
सभागृहे अटींवर उपलब्ध
सार्वजनिक ठिकाणी, खुल्या मैदानात फिरणे, सायकलिंग, सर्व क्रीडा प्रकारांना परवानगी असेल तर इनडोअर क्रीडा प्रकारास सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत परवानगी असेल. जिल्ह्यात लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ ५० नागरिकांच्या क्षमतेने लग्न सोहळा करता येईल. तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, बैठका इत्यादी कार्यक्रमांना हॉलच्या ५० टक्के क्षमतेच्या नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजण्यास परवानगी असेल.
जिमला ५० टक्क्यांची अट कायम
जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, स्पा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर यांना केवळ ५० टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी असेल. मात्र, वातानुकूलित यंत्र वापरता येणार नाही.