वारंगाफाटा स्थानकात बस नेण्यासाठी खाजगी कामगार तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:23 AM2018-01-22T00:23:55+5:302018-01-22T00:25:42+5:30
राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी उभे राहून स्थानकात बस घेऊन जा, अशी विनंती करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. अनेक चालक या विनंतीकडे दुर्लक्ष करून याकामी तैनात केलेल्या खाजगी कामगारांसोबत हुज्जत घालताना दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगाफाटा : राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी उभे राहून स्थानकात बस घेऊन जा, अशी विनंती करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. अनेक चालक या विनंतीकडे दुर्लक्ष करून याकामी तैनात केलेल्या खाजगी कामगारांसोबत हुज्जत घालताना दिसत आहेत.
वारंगाफाटा हे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथून खूप मोठ्या प्रमाणावर एसटी बसची वर्दळ असते. वारंगा फाटा येथे बसस्थानक असून एसटी बसेस थांबण्यासाठी मैदान आहे. या ठिकाणी प्रवाशांना निवाºयाची चांगली व्यवस्था आहे. परंतु मागील दहा ते बारा वर्षापासून वसमत-वारंगा या एकमेव बस व्यतिरिक्त एकही बस बसस्थानकात जात नाही. याविषयी अनेक वेळा जनतेतून तसेच वर्तमानपत्रातून माहिती दिली जात होती. परंतु संबंधित एसटी महामंडळावर याचा काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. सदरील बसस्थानकाचा अवैध वाहतूक थांबविण्यास व गॅरेजसह इतरही कामासाठी उपयोग केला जात आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम संबंधितांवर झाला आहे. बातमी प्रकशित झाल्यापासून कळमनुरी आगारचा एक कर्मचारी सर्व एसटी बसची नोंद घेण्यासाठी वारंगा फाटा बसस्थानकात नियुक्त केला आहे. तेव्हा कुठे काही प्रमाणात चालक स्थानकात बस आणत आहेत. चौकातच थांबत असलेल्या बसच्या चालकांना बसस्थानकातच जाऊन थांबविण्याची विनंती करण्यासाठी बाळापूर येथील १७ वर्षांपासून बसस्थानकात काम करणारे भारत सखाराम मीरटकर वारंगा येथे पाठविले आहे.
मीरटकर यांची एसटी महामंडळात कुठल्याही प्रकारची अधिकृत नियुक्ती नाही. असे असतानाही मीरटकर या मार्गावर भर रस्त्याच्या मध्यभागी व वाहनाच्या वर्दळीत उभे राहून आपला जीव धोक्यात घालून चौकातच बस थांबविणाºया बसचालकांना स्थानकात बस नेण्यासाठी प्रत्येक बस चालकास विनंती करीत आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्केच बस चालक मिरटकर यांच्या शब्दाला मान देऊन बस बसस्थानकात घेऊन जात आहेत. बरेच चालक तर मीरटकर यांच्याशी हुज्जत घालत रस्त्यावरच प्रवाशी उतरवुन निघून जात आहेत.
त्यामुळे या ठिकाणी चालकांना बसस्थानकाचा मार्ग दाखविण्याासठी नियुक्त करण्यात आलेले दोघेही पुरते वैतागुन गेले आहेत. लाखों रुपये खर्चून उभारलेल्या बसस्थानकात बस घेऊन जाण्यास चालकांना काय अवघड वाटत असावे? याचा काय अद्याप शोध लागलेला नाही. स्थानकात बस नेण्याची विनंती करण्याची वेळ नागरिकांसह संबंधित एसटी महामंडळावर आली असून चालक, वाहक मात्र कोणाचेही ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर प्रवाशांना पळत जावून बस पकडण्याशिवाय पर्यायच नाही. सदरील एसटी चालकांना बस ही स्थानकात नेण्याची विनंती करण्याऐवजी सक्तीचे करण्याची गरज असल्याचे प्रवाशातून बोलल्या जात आहे. निदान चौकात उभे राहून बसची प्रतिक्षा पाहण्याची वेळ कायमची टाळण्यास मदत होऊन चालकांची सवय मोडून जाईल.
बस मागे धावण्याची वेळ
बसस्थानक उभारल्यापासून मोजकेच दिवस स्थानकात बस गेल्या आहेत. त्यामुळे एवढे मोठे बसस्थानक उभारले तरी कशाला? असा सवाल प्रवाशांतून केला जात आहे. स्थानकात बस येत नसल्याने प्रवाशी उन्हा तान्हात चौकात किंवा स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून बसची प्रतीक्षा करीत आहेत.
वारंवार वरिष्टाकडे तक्रारी करुनही चालकांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. चालकांची एवढी मुजोरी नेमकी वाढली तरी कशी काय? असे एक ना अनेक तर्क लावले जात आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.