औंढा नागनाथ (हिंगोली ) : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डफ, ढोल, संबळ व ताशांचा दणदणाट पाहायला मिळाला.
सकल धनगर समाजाच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या- मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावी, धनगर समाजाच्या मुला-मुलींसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावी, शेळी- मेंढी विकास महामंडळास आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षणासाठीच्या आंदोलन प्रसंगी दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत या मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला मंदिर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली, हातात पिवळे झेंडे घेऊन येळकोट येळकोट च्या गर्जनेत शासकीय विश्रामगृहाच्या मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला, यावेळी शेकडोच्या संख्येने समाज बांधव मोर्च्यांत सामील झाले होते. मोर्च्यांचे रूपांतर सभेत होऊन तहसील कार्यालयासमोर विविध संघटनेच्या व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी शिवसेना, मराठा सेना,तालुका वकील संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉग्रेस यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यानंतर नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.