आखाडा बाळापूर : एकाच दिवशी, एकाच वेळी तब्बल ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप घरपोच करून महाराजस्व अभियानाचा उद्देश यशस्वी झाला आहे. ‘प्रशासन आपल्या दारी’ हे ब्रीद कळमनुरी उपविभागाने सत्यात उतरविले असल्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत महाराजस्व अभियानांतर्गत जातप्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, माजी जि. प. अध्यक्ष शिवरानी नरवाडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार मयूर खेंगळे, आ. संतोष बांगर, डॉ. अरुण सावंत, रावसाहेब पाटील सावंत, महेश गोविंदवार, माधव सावंत, चंद्रकांत सूर्यवंशी, मोहम्मद अजहरूद्दिन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्राचा दाखला वितरित करण्यात आला. प्रशासनाच्या लालफितीतून प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. विद्यार्थी व पालकांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारी कचेऱ्यांना चकरा माराव्या लागतात. त्याशिवाय त्यांना आर्थिक झळही सहन करावी लागते परंतु महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या पुढाकाराने एकाच दिवशी ७९ शाळांतील जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे दाखले घरपोच मिळत असल्याने महाराजस्व अभियानाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले. या कार्यक्रमाला कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा शेवाळाचे मुख्याध्यापक एस. के. जंजाळ, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. फोटो नं. ११