आचारसंहितेत पाणी प्यायचेच नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:15 AM2019-03-29T00:15:36+5:302019-03-29T00:15:57+5:30

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.

 Do not drink water in ethics? | आचारसंहितेत पाणी प्यायचेच नाही का ?

आचारसंहितेत पाणी प्यायचेच नाही का ?

Next

हिंगोली : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढत चालली आहे. उन्हाचा पाराही आता चांगलाच वाढला आहे. दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. निवडणुकांमुळे कसेतरी पुढारी मात्र चेहऱ्यावरचा रंग उडेपर्यंत जोरात फिरत आहेत. तर दुसरीकडे मतदार गावात पाण्याचा थेंब नसल्याने रानोमाळ भटकत आहेत. टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागू नये म्हणून उमेदवारही दुपारी नाहीतर रात्री गावात जाऊन मतदारांना साकडे घालताना दिसत आहेत. तर टंचाईचा मुद्दा काढला की, आचारसंहितेमुळे विलंब होत असेल. मात्र पाणी मिळेल, असे सांगितले जात आहे. खरेतर टंचाईच्या कामांना आचारसंहितेची अडचण नाही. मात्र तरीही गोरगरीब, भाबड्या जनतेला हेच कारण ऐकावे लागत आहे. आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय कडेकोट बंदोबस्तात आहे. तेथे पोलीस कुणालाच आतमध्ये एन्ट्री करू देत नसल्याने टंचाईचा प्रश्न घेऊन येणारे बिचारे आल्या पावली परत जात होते.
जिल्हा परिषदेत गेल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत, एवढेच ऐकायला मिळते. त्यामुळे उद्विग्नपणे नागरिक ‘आचारसंहितेत आम्ही पाणीच प्यायचे नाही का’, असा सवाल करीत आहेत.
२८ नळयोजना दुरुस्ती, १00 विंधन विहिरींचे प्रस्ताव
हिंगोली जिल्हा परिषदेकडून दुरुस्ती व पूरक नळयोजनांचे जवळपास २८ प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय नाही.
नव्याने विंधन विहिरींचेही शंभरावर प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. पहिलेच मार्गी नसल्याने यांचे काय होणार, हा तर त्याहून गंभीर प्रश्न आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही आता वाढली आहे. जवळपास १७ अधिग्रहणे ही टँकरसाठी करण्यात आली आहेत. तर याशिवाय १५४ जलस्त्रोतांचे अधिग्रहण गावातील टंचाई दूर करण्यासाठी करण्यात आले आहे. यात सर्वाधिक ४२ अधिग्रहणे वसमतमध्ये आहेत. तर हिंगोली २७, कळमनुरी ३८, सेनगाव २५, औंढा नागनाथ २२ अशी संख्या आहे. मात्र अनेक गावांत अशा स्त्रोतांचीही मर्यादा पडत असून गावाच्या शिवारातील काही स्त्रोत असल्याने पायपीट करावी लागत आहे. त्याचा फटका बसत आहे.
टंचाईच्या झळा वाढल्या असून आता ३६ हजार ६४८ लोकसंख्या टँकरचे पाणी पित आहे. यात हिंगोली-३000, कळमनुरी-११२८३, सेनगाव-१४५७0, वसमत ३0२५, औंढा ४७७0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.
टँकर पोहोचले २६ वर
हिंगोली जिल्ह्यात उपाययोजनांपैकी टँकर ही उपाययोजना तेवढी काही ठिकाणी जलदगतीने केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टँकरर्सची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. त्याद्वारे दररोज ६0 खेपा मंजूर आहेत. १५ गावांना टँकर लागले आहेत. यात हिंगोलीत ३ गावांसाठी ४, कळमनुरीत ६ गावांसाठी ८, सेनगावात ३ गावांसाठी ८, वसमतला एकएक गावासाठी दोन, औंढा नागनाथ तालुक्यातील २ गावे व तीन वाड्यांसाठी ४ टँकर सुरू आहेत.
हिंगोलीत कनका, लोहगाव, कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवनी खु., पोतरा, सिंदगी, हातमाली, सेनगावात जयपूर, कहाकर खु. व सेनगाव, वसमतला बाभूळगाव, औंढ्यात रामेश्वर, येहळेगाव सोळंके या दोन गावांसह संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मणनाईक तांडा या गावांत टँकर सुरू आहे.

Web Title:  Do not drink water in ethics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.