हिंगोली : १ मेपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस देण्याच्या संदर्भात शासनाने सूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभही झाला आहे. १ मे रोजी शहरातील कल्याण मंडपम येथे लस देण्यात आली. लसींचा साठा कमी असल्यामुळे ‘कोणी लस देता का लस’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे ५ हजार डोस १ मे रोजी प्राप्त झाले आहेत. पाच हजारांपैकी एक-एक हजार डोस हे जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यांना वाटपही करण्यात आले आहेत. आजमितीस कोव्हीशिल्डच जिल्ह्यात उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिन जिल्हा तसेच शहर स्तरावर संपलेले आहे. दोन्ही लसींबाबत जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, मोठ्या प्रमाणात लस थोड्याच दिवसांत उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. तेव्हा नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. आतापर्यंत ७१ हजार ९४१ नागरिकांना कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आलेली आहे.
दि. १ मे रोजी १८ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिकही लसीकरण केंद्रावर येऊन जात होते. परंतु, त्यांना लस काही मिळत नव्हती. लसींचा तुटवडा झाल्यामुळे नागरिकांमध्ये थोडी नाराजी दिसून येत आहे. लस लवकर उपलब्ध करावी, अशी मागणीही होत आहे.